Published on
:
18 Nov 2024, 9:15 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:15 am
‘तुमच्या मोबाईल क्रमांकाचा देश विघातक कृत्यामध्ये गैरवापर झाला आहे. तुम्हाला आमच्या सीबीआय क्राइम ब्रांचच्या अधिकार्यांसोबत बोलावे लागेल’, असे धमकावून सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या रकमा उकळू लागले आहेत. परदेशातून ऑपरेट होत असलेल्या अशा रॅकेटपासून बचावासाठी मोबाईलधारकांनी सजग राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर विभागाने केले आहे.
सायबर गुन्हेगार इंटरक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सचा (आयव्हीआर) वापर करतात. आयव्हीआर हे एक स्वयंचलित टेलिफोन सिस्टम तंत्रज्ञान आहे. कम्प्यूटराईज्ड कॉलिंगसाठी देखील याप्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये एकाचवेळी अनेकांशी संपर्क साधून मोबाईलधारकांना भीती दाखवून त्यांची गोपनीय माहिती सांगण्यासाठी दबाव आणला जातो आहे.
बँका किंवा इतर शासकीय यंत्रणा बहुतांशवेळा मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधत नाहीत. ऑफिसच्या लँडलाइनवरून कॉल केला जातो. फसवणुकीच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, हे क्रमांक सामान्य मोबाइल क्रमांक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कॉल्सबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच, बँका किंवा शासकीय यंत्रणांना या कधीही वैयक्तिक किंवा गोपनीय माहितीची विचारणा करत नाहीत.
’व्हॉइस क्लोनिंग’मुळे आवाजात बदल
नागरिकांना गंडविण्यासाठी सायबर गुन्हेगार ’व्हॉईस क्लोनिंग’चा वापर करतात. त्यामुळे कॉलर हा फसवणूक करणारा असल्याचे समजून येत नाही. आवाजाचे क्लोनिंग केल्याने त्यांचा आवाज पोलिस ठाण्यातील आधिकर्यांसारखा भारदस्त वाटतो. ज्यामुळे नागरिक घाबरतात.
सदर सायबर गुन्हेगार हे ते ‘डीओटी’मधून (डिपार्टमेंट ऑफ टेलेकम्युनिकेशन) बोलत असल्याचे भासवतात. तुमच्या नावाने सिमकार्ड घेतले आहे आणि त्याचा गैरवापर झाला आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. तुम्ही याबाबत कोणालाही काही सांगू नका, असे सांगून भीती घातली जाते. मात्र, असा कॉल आल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता त्याची खात्री करणे आवश्यक आहे.
देशविघातक कृत्यांमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा सहभाग आढळून आला आहे. तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती घालून सायबर गुन्हेगार नागरिकांच्या रकमा उकळू लागले आहेत. मात्र, नागरिकांनी अशा कॉल्सना बळी पडू नये. अशाप्रकारे कोणी धमकावत असल्यास, तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.
प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे