Published on
:
18 Nov 2024, 8:50 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:50 am
विधानसभेच्या पनवेल मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहणार आहे. या मतदारसंघात भाजपचे रायगडमधील प्रभावी नेते प्रशांत ठाकूर हे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून शेकापचे बाळाराम पाटील रिंगणात आहेत. याशिवाय ठाकरे गटाच्या लीना गरड रिंगणात आहेत
पनवेल हा साडेपाच लाखांहून जास्त मतदार असलेला मोठा मतदारसंघ आहे. प्रशांत ठाकूर हे या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २००९ ला पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बाळाराम पाटील लढवली होती आणि विजयीसुद्धा झाले होते. शेकापचा बालेकिल्ला त्यावेळी काँग्रेसने काबीज केला होता. त्यानंतर २०१४ ला प्रशांत ठाकूर भाजपमध्ये गेले आणि विजयीसुद्धा झाले. २०१९ लाही ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. तिन्ही टर्म सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आता ते भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाच्या लीना गरड रिंगणात असल्या तरी शेकापचाही उमेदवार रिंगणात असल्याने विरोधी मतांचे विभाजन होणार हे निश्चित झाले आहे. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. पनवेल विधानसभेत पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर हा भाग येतो. बहुतांश स्थलांतरित मतदार येथे आहेत. नव्या हौसिंग सोसायट्यांमुळे मुंबईतून उपनगरात गेलेल्या मतदारांचा भरणा येथे पाहायला मिळतो. त्यामुळे सुशिक्षित आणि संयमी उमेदवाराला येथे अधिक पाठिंबा मिळतो. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला हा मतदारसंघ सध्या हायटेक होताना दिसत आहे. नव्याने होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार होऊ पाहणाऱ्या या मतदारसंघात विकास प्रकल्पांची चलती आहे. याचा फायदा सत्तारूढ आमदारांना होण्याची शक्यता अधिक आहे.