जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, कडधान्य आणि पालेभाज्यांच्या किमती कडाडल्या असून पेट्रोल- डिझेलचे दरही गगनाला भिडलेले आहेत. या महागाईच्या भडक्यात आता एसटी, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीच्या रूपाने आणखी तेल ओतण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे. मुंबईकरांचा प्रवास येत्या 1 फेब्रुवारीपासून महागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडय़ात किलोमीटरमागे तीन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर एसटीच्या भाडय़ात तब्बल 15 टक्क्यांची वाढ करून गावखेडय़ापर्यंत पोहोचवणाऱया लालपरीचा परवडणारा प्रवासही महाग केला आहे. रिक्षा-टॅक्सी भाडय़ाचे नवे दर 1 फेब्रुवारीपासून तर एसटी बसेस भाडय़ाचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास तीन कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षित असते, मात्र गेल्या काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही, असे कारण देत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढीचे समर्थन केले आहे. दरम्यान, खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ करण्यात यावी. रिक्षाच्या किमान भाडय़ात तीन रुपये तर टॅक्सीच्या किमान भाडय़ात चार रुपयांची वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव परिवहन विभागासमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आज परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ झाल्यानंतर किमान भाडे 28 वरून 32 रुपये इतके होणार आहे. तर रिक्षाचे किमान भाडे 23 वरून 26 रुपये इतके होणार आहे. वाहतूककाsंडीचा आधीच जाच, त्यात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा जाच अशा कात्रीत मुंबईकर सापडणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
असे वाढणार भाडे
रिक्षा 23 वरून 26
टॅक्सी 28 वरून 32