कोल्हापूर : अचानक केस गळती होऊन टक्कल पडू लागल्याने बुलडाणा जिल्ह्यातील 13 गावांमधील महिला, पुरुष आणि मुले भयभीत झाली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील फक्त शेगाव तालुक्यापुरतेच असलेले केस गळतीच्या रोगाचे लोण आता नांदुरा आणि मोताळा तालुक्यांतही पसरू लागले आहे. एका आठवड्यात 170 पर्यंत असलेली केस गळती रुग्णांची ही संख्या आता 230 पेक्षा अधिक झाली आहे. ना रोगाचे निदान, ना त्यावर उपचार, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या या गावकर्यांना आता सामाजिक बहिष्काराच्या भयाने पछाडले आहे. अनेक टक्कलग्रस्त मुलांनी शाळा सोडली आहे.
केस गळतीने ग्रस्त लोकांकडे बाजारात लोक वेगळ्याच नजरेने बघतात. शाळेत टक्कलग्रस्त मुलगा शेजारी बसला तर आजार आपल्यालाही होईल या भीतीने इतर विद्यार्थी केस गळतीग्रस्त विद्यार्थ्यापासून दूर बसतात. त्यामुळे बहिष्काराच्या भीतीने टक्कल पडलेल्या मुलांनी शाळेत जाणे बंद केले आहे. शेगाव, नांदुरा आणि मोताळा या तीन तालुक्यांतील गावांतील विवाह इच्छुकांचे स्थळ पाहणी कार्यक्रम आधीच निश्चित झालेे होते. मात्र, केस गळती आजाराची चर्चा पसरताच स्थळ पाहणी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
एक आठवडा लोटला, ‘आयसीएमआर’चा अहवाल आला नाही, निदानाचा पत्ता नाही!
प्रारंभी भूगर्भातील क्षारयुक्त पाण्यात नायट्रेटचे प्रमाण खूप जास्त असल्याने केस गळती होत असल्याचे सांगितले गेले. मात्र, शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे. दिनांक 14 ते 16 जानेवारी असे तीन दिवस दिल्लीचे ‘एम्स’ आणि ‘आयसीएमआर’ (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), चेन्नई, भोपाळ, पुणे येथील ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांचे जम्बो पथक बुलडाण्याच्या केस गळतीग्रस्त गावांत तळ ठोकून होेते. या पथकाने केस गळतीने टक्कल पडलेल्या शेगाव तालुक्यातील रुग्णांचे केस, नखे, लघवीचे नमुने घेतले. या नमुन्यावर दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये संशोधन होणार आहे. बाधित गाव परिसरातील माती, पाणी, अन्नधान्य, भाजीपाल्याचेही नमुने घेण्यात आले असून, त्यावर भोपाळ ‘एम्स’मध्ये संशोधन केले जाईल. या पदार्थांमध्ये काही विषारी घटक आहेत काय, हे तपासले जाणार आहे. हे संशोधन होत राहील; पण सध्या या रोगाने 13 गावांतील दोनशेवर लोक ग्रस्त आहेत. त्यांच्या आजाराचे निदान कधी होईल, असा सवाल ‘उबाठा’ शिवसेनेचे संप्रर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शासनाला विचारला आहे.
निदान नाही, उपचार नाही, औषधही नाही
‘आयसीएमआर’ आणि ‘एम्स’च्या शास्त्रज्ञांचे पथक असे नमुने घेऊन गेले. या गोष्टीला एक आठवडा लोटला आहे. मात्र, या पथकाने केस गळतीने टक्कल पडण्यामागच्या कारणांचा शोध घेणारा अहवाल अद्यापही सादर केलेला नाही. त्यामुळे 13 गावांतील 230 रुग्णांच्या रोगाचे निदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे निदान नाही म्हणून कोणतीच उपचार पद्धती निश्चित करण्यात आली नाही. आरोग्य विभागाने केवळ व्हिटॅमिनच्या साध्या गोळ्या या गावकर्यांच्या माथी मारल्या असून, त्यांना दैवाच्या स्वाधीन केले आहे.
‘डब्ल्यूएचओ’ टीमला बोलवा; प्रा. नरेंद्र खेडेकर यांची मागणी
ना निदान, ना उपचार आणि पुन्हा सामाजिक बहिष्काराची भीती अशा भयसावटाखाली वावरणार्या गावकर्यांसाठी ‘उबाठा’ शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी कंबर कसली आहे. केस गळतीने टक्कल पडणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा रोग आणखी किती गावांतील रुग्णांना कवेत घेईल, याची चिंता तेथील लोकांना सतावत आहे. आरोग्य खात्याने हात टेकले आहेत. ‘आयसीएमआर’चा रिपोर्ट येईल तेव्हा येईल; पण जगात सर्वोत्तम संशोधन करणार्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांचे पथक तत्काळ बुलडाण्यात बोलवा, अशी मागणी प्रा. खेडेकर यांनी केली आहे.
डीएचओ गीते म्हणतात, गळलेले केस महिनाभरात पुन्हा येतील
प्रस्तुत संपादकांनी बुलडाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्याशी थेट संवाद साधला. ते म्हणाले, “केस गळती कशामुळे होते याचे निदान अद्याप झालेले नाही. ‘आयसीएमआर’ची टीम अहवाल देईल तेव्हा काय ते कळेल.” परंतु, तोपर्यंत या रुग्णांनी काय करायचे? या रोगाने तीव्र रूप धारण केले तर? त्यावर डॉ. गीते उत्तरले, “गेलेले केस एक महिन्यात पुन्हा येतील. त्याचे एवढे काय?” पण, सामाजिक बहिष्काराने दहशत निर्माण झालेल्या गावकर्यांची भीती दूर कोण करणार, हा प्रश्न उभा आहे.