40 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू:जेरबंद करण्यासाठी 30 पिंजरे, 15 कॅमेरा ट्रॅप लावला

2 hours ago 1
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वनपरिक्षेत्र ओतूर अंतर्गत पिंपरी पेंढार गावातील नगर- कल्याण रस्त्यापासून जवळच आपल्या शेतात असणाऱ्या घरालगत सुजाता रवींद्र डेरे ( वय- 40 वर्षे) या बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घराच्या समोरील बाजूस प्रातःविधीस गेल्या होत्या. त्याचवेळी लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्यांच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस घराच्या अंगणात असलेले त्यांचे पती रवींद्र डेरे यांनी आरडा- ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याना न जुमानता सुजाता यांना सुमारे 20-25 फूट सोयाबीनच्या शेतात फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता, गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून पाहणी करून शोध घेतला असता सुजाता यांचा बिबट हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मयत सुजाता यांचे शव शवविच्छेदनाकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे येथे पाठविण्यात आले. याबाबत महिती समजताच घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 30 पिंजरे, 15 कॅमेरा ट्रॅप लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. जुन्नरचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर यांनी तात्काळ ओतूर व आळे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचेसह उपस्थित राहून परिस्थिती हाताळली.त्याचवेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व जुन्नर विधान सभेचे आमदार अतुल बेनके यांनी प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यास मदत केली. कुकडी व घोड नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची असलेली मोठी संख्या लक्षात घेता, शेतातील व लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, घरातील शौचालयाचा वापर करणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सुचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे असे कळकळीचे आवाहन जुन्नर वन विभागाकडून जुन्नर, शिरूर आंबेगाव व खेड तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article