Published on
:
25 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:30 am
वॉशिंग्टन : अमेरिकेचे सर्वाधिक लोकप्रिय माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांच्या हत्येचा उलगडा तब्बल 62 वर्षांनंतर होण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केनडींसह अन्य महनीय प्रभृतींच्या हत्येच्या फायली सार्वजनिक करण्याचे आदेश गुप्तचर यंत्रणांना दिले आहे. या आदेशामुळे अमेरिकन जनतेला सत्य समजण्यास मदत होणार आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी केनडीसह अन्य महनीय प्रभृतींच्या हत्येच्या फायली सार्वजनिक करणार असल्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी निर्णयाचा सपाटा लावला आहे. केनडी यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी 15 दिवसांत समिती नियुक्त करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाचा 1000 वा दिवस
अमेरिकेतील पहिले तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून केनडी यांनी ओळख प्रस्थापित केली होती. पदावर असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 1000 वा दिवस साजरा करण्यासाठी कार्यालयात जात असताना टेक्सास या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती.
मार्टिन लुथर किंग ज्युनिअर
केनडी यांच्या हत्येनंतर अमेरिकेसह जगातील अन्य देशांनाही मोठा हादरा बसला होता. 62 वर्षे झाली तरी त्यांची हत्या कशासाठी झाली, याचा उलगडा होऊ शकला नव्हता. ट्रम्प यांच्या आदेशामुळे हत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. सिनेटर रॉबर्ट एफ. केनडी आणि मार्टिन लूथर किंग ज्युनिअर यांच्या हत्येच्या फायलीही सार्वजनिक करण्यात येणार आहेत.
केनडी यांच्या कुटुंबीयांसह अमेरिकेतील जनतेला केनडी यांच्या हत्येसंदर्भातील सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एफबीआयसह गुप्तचर यंत्रणांनी 15 ते 45 दिवसांत त्याबाबत कार्यवाही करावी, असे ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे.