मतदान करून परत येताना अपघात File Photo
Published on
:
22 Nov 2024, 8:04 am
Updated on
:
22 Nov 2024, 8:04 am
अकोले तालुक्यात मतदान करून सिन्नरकडे परतत असताना रस्त्याच्या कडेला दोन दुचाकीसमवेत उभे असलेल्या चौघांना भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेवर उपचार सुरू असताना तीनेही काल गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. अपघाताची ही घटना देवठाण-सिन्नर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली.
नुकतीच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुण्याहून मतदान करण्यासाठी राहुरीला येत असलेल्या पित्रा-पुत्राचा सुपे शिवारात अपघात झाला. त्यात दोघांचाही मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असतानाच त्याच दिवशी (बुधवारी) अकोलेतही दुसरी दुर्दैवी घटना घडली
कामानिमित्त सिन्नर येथे वास्तव्यास असलेले गणेश भिकाजी झोळेकर, सर्वेश संतोष झोळेकर, ज्योती सुभाष झोळेकर (सर्व धुमाळवाडी) व अनिकेत सुभाष लगड (पिंपळगाव नाकविंदा) हे अकोले येथे दोन दुचाकीवरून बुधवारी मतदानासाठी आले होते. मतदानानंतर ते दुचाक्यांवरून पुन्हा सिन्नरकडे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास देवठाण जवळील शेरी फाटा येथील गायकवाड वस्तीजवळ हे चार जण रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी आलेल्या एका मालवाहू पिकअप गाडीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वाहन चालवत या चौघांना जोराची धडक दिली. त्यात गणेश झोळेकर, सर्वेश झोळेकर, अनिकेत लगड आणि ज्योती झोळेकर असे चौघेही गंभीर जखमी झाले.
जखमींना ताबडतोब अकोले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी यातील गणेश झोळेकर, सर्वेश झोळेकर तसेच अनिकेत लगड यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर ज्योती झोळेकर यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृतीही चिंताजनक होती. मात्र गुरुवारी दुपारी ज्योती यांचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच या अपघातातील मृतांचा आकडा चार झाला.