Akaash Solunke: अनाथ, बेवारस, मनोरुग्णांसाठी ‘माणूस’ झालेल्या निलंगेकरांची भन्नाट कथा

2 hours ago 2

चुकली दिशा तरीही, हुकले न श्रेय सारे…

– मिलिंद कांबळे
निलंगा (Akaash Solunke) : ‘चुकलिया माये, बाळ हुरु हुरु पाहे… जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी…’ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ही विराणी (विरहिणी) आपण अनेक वेळा ऐकली, मात्र ती प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेईलच, असेही नाही. अशी विराणी काळजाला भिडलेल्या निलंग्यातील तरुणांनी ‘माणूस’ होण्याचे ‘वेड’ लावून घेतले. ‘चुकली दिशा तरीही…’ म्हणत पाऊल टाकले अन् अशा
‘वेड्या मुशाफिरां’ना साथ मिळत गेली…
खिशात पैसा असला की दानधर्म, समाजसेवा, करणारे खूप सापडतात. अनेक जण पैसा असूनही इतरांना मदत करण्यास कचरतात, पण ज्यांच्यापुढे स्वत:च्या आयुष्याची चिंता असते, अशा तरुणाईने निलंगा शहरात बेवारसांना, मनोरुग्णांना गोंजारले… आपलेसे केले अन् मायेचे ‘आकाश’ दिले. होय, (Akaash Solunke) आकाश बालाजी सोळुंके… वय २४, रा. सावनगिरा ता. निलंगा.

शेतकरी कुटुंबातील आकाश पैशाने नव्हे, मनाने श्रीमंतच. या श्रीमंतीने तो बेवारस, मनोरुग्ण, अनाथ, असह्य आणि आजारी वृध्दांच्या मदतीसाठी धावला. रस्त्यावर बेवारस, अनाथ, आजारी, वृद्ध आणि असहाय लोक जमिनीचे अंथरुण व आकाशाचे पांघरूण घेत दिसले की, आकाशचे मन अस्वस्थ होत असे. त्यांनी आपल्या मित्रांशी बोलून श्री राधा कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. निलंगा बसस्थानक, औराद शहाजानी, कलांडी, लातूर, पंढरपूर, परभणी, उमरगा, पैठण, कर्नाटक , तेलंगाना, राज्याचा सीमाभाग आदी भागातून जवळपास ३१ अनाथांना आणले. त्यांचे केस कापणे, नखे काढणे, त्यांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आश्रयाला आणणे. मागच्या दीड वर्षापासून अनाथ, बेवारस व मनोरुग्णांना सांभाळण्याचे काम सुरू केले. आता मनोरुग्ण दिसले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून (Akaash Solunke) आकाशला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपर्क केला जातोय. त्यांना आहे त्या ठिकाणाहून आणण्याचे काम आकाशच्या माध्यमातून होत आहे.

आपल्या मित्राच्या या कामात आदित्य सुरवसे, संकेत नाटकर, मल्हारी मदने, गौरीशंकर भंडारे, तौफिक शेख हे सर्वजण वेळ मिळेल तशी सेवाही देत आहेत. तर वर्षभरात अनेकांनी आपल्या मुलांचे वाढदिवस मनोरुग्णांसोबत साजरे केले. अनेकजण इतर कार्यातील खर्च टाळून त्यांना जेवणही देत आहेत.

ख्यातनाम कवी विंदा करंदीकरांनी म्हटलंय,
‘चुकली दिशा तरीही, हुकले न श्रेय सारे;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे.’
या ओळी ‘आकाश’च्या पखांना हत्तीचे बळ देतील, एवढेच!

अनेकांना घरी सोडण्यात यश…

सकाळी साडेपाच वाजता सर्वांना उठवून व्यायाम, सकाळी चहा, नाष्टा, दुपारी आणि संध्याकाळी चविष्ट जेवण असा त्यांचा दिनक्रम आहे. ३१ पैकी अनेक जणांच्या घरचा पत्ता शोधून त्यांच्या घरी सोडण्याचे कामही त्यांनी केले. आज रोजी ३१ बेवारस वास्तव्यास असून त्यातील अनेक जण मनोरुग्ण आहेत. त्यांना स्वतःची ओळख सांगता येत नाही. समाजातील दानशूरांनी आपल्याकडील जुने कपडे व वाया जाणारे अन्न आमच्यापर्यंत पोहोच करावे, एवढी माफक अपेक्षा आकाशची आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article