Published on
:
16 Nov 2024, 5:06 am
अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणूक यावेळी तिरंगी लढत आहे. या विधानसभा मतदारसंघात आगरी, कोळी, आदिवासी आणि मुस्लीम समाजीची मते लक्षणिय आहेत. त्यामुळे या समाजाची एकगठ्ठा मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांकडून समाज संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या मतदारसंघात एकट्या कोळी समाजाची सुमारे 1 लाख, आदिवासी समाजाची 35 हजार तर मुस्लीम समाजाची सुमारे 30 हजार मते आहेत. ही सर्व मते एकगठ्ठा आपल्यालाच मिळावी यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरु असलेले दिसून येत आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्याचा काही भाग असा विभागालेला आहे. मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या 3 लाख 6 हजार आहे. या मतदारसंघात आगरी, कोळी, आदिवासी आणि मुस्लीम समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. किनारपट्टी डोंगर भागात आदिवासी समाज तर किनारपट्टी भागात कोळी आणि मुस्लीम समाजाची वस्ती आहे. शेती, मच्छीमारी आदी पारंपरिक व्यवसाय या तिनही समाजांचा आहे. मतदारसंघातील या प्रमुख घटकांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. आजही या समाजांना आपल्या सोयी-सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यामुळे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या समाजाच्या संघटनांनी वेळोवेळी राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यात यश आलेले नाही.
अलिबाग-मुरुड मतदारसंघात कोळी समाजाची वस्ती आहे. या मतदारसंघात आजघडीला कोळी समाजाची एक लाख मते असल्याचा दावा समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. कोळी समाजातील नारायण भगत 1972 च्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र भगत यांच्या 1980 च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कोळी समाजाला संधी मिळालेली नाही. आज एक लाखभर मतदार असूनही एकगठ्ठा नसल्याने समाज राजकीय दृष्ठ्या मागे पडल्याचे समाजाच्या नेत्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे या निवडणुकीत कोळी समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होत आहे. कोळी समाजाची मते खर्या अर्थाने निर्णायक ठरू शकतात.
त्याचबरोबर अलिबाग मतदारसंघात आदिवासी समाजाची सुमारे 35 हजाराहून मते आहेत. डोंगरकपारीत राहणार्या भूमिहीन, अल्पभूधारक समाजाची आजही परवड सुरु आहे. या मतदारसंघातून आदिवासी समाजालीही प्रमुख पक्षांकडून दुर्लक्षित ठेवले आहे. आपल्या हक्कांसाठी या समाजाने मोर्चे आंदोलने केली आहे. अनेक वेळा एकजुट दाखवली आहे. मात्र समाजाच्या समस्यांमध्ये फरक पडलेला नाही. या निवडणुकीत या मतदारसंघातील आदिवासी समाज कोणती भूमिका घेतो हेही महात्वाचे ठरणार आहे. सध्या सर्वच उमेदवारांकडून आदिवासी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अलिबाग-मुरुड मतदारसंघात मुस्लीम समाज हा महत्वाचा घटक आहे. विशेष करून मुरुड तालुक्यात मुस्लीम समाजाची वस्ती अधिक आहे. संपूर्ण अलिबाग-मुरुड मतदारसंघात मुस्लीम समाजाची 30 हजाराहून अधिक मतदार असल्याचा दावा समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. याही समाजाच्या समस्या आजही कायम आहेत.
मुस्लीम समाजाकडे काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार म्हणून पाहिले जात होते. मात्र जिल्हयात बॅ. अंतुले यांच्यानंतर काँग्रेस अस्तित्व कमी झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जात नसल्याने पक्षाचा हक्काचा मतदार विखुरला जात आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे खा. सुनील तटकरे यांना खुद्द श्रीवर्धनमध्ये मताधिक्य कमी झाले आहे. देशपातळीवरील निवडणुकीत दिलेला तो कौल होता. मात्र आज राज्याच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढत होत असताना मुस्लीम समाज काय भूमिका घेतो हेही महत्वाचे ठरणार आहे.
कोळी समाजाला एकदाच मिळाली संधी
अलिबाग-मुरुड मतदारसंघात कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. या मतदारसंघात आजघडीला कोळी समाजाची एक लाखाच्या आसपास मते असल्याचा दावा समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. कोळी समाजातील नारायण भगत 1972 च्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र भगत यांचा 1980 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कोळी समाजाला संधी मिळालेली नाही.