उद्योगपती गौतम अदानी यांच्या अटक वॉरंट प्रकरणावरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. अदानींनी 2000 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे अदानींना तात्काळ अटक करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
अदानी ग्रीन एनर्जीला सौरउर्जा प्रोजेक्ट मिळवून देण्यासाठी गौदम अदानी यांनी 265 मिलियन डॉलर (जवळपास 2236 कोटी रुपये) लाच दिली आणि अेरिकेतील बँका आणि गुंतवणूकदारांकडून फंड जमा करून त्यांना फसवले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी एनडीए सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
अदानी यांनी 2000 कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यांना अटक केली पाहिजे. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांची पाठराखण करत आहेत. पंतप्रधान मोदी अदानींना सपोर्ट करत आहेत. इतक्या मोठ्या घोटाळ्यानंतरही अदानींविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि होणारही नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला.
अदानींना अटक होणार होणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे, पंतप्रधान मोदीं त्यांच्या पाठीशी आहेत. अदानींच्या 2000 कोटींच्या या घोटाळ्याप्रकरणी संसदेच्या संयुक्त समितीद्वारे (JPC) चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. हे प्रकरण आम्ही संसदेतही उचलू. अदानी यांनी गुन्हा केला आहे, असे अमेरिकेच्या संस्थेने म्हटले आहे. तिथेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पंतप्रधान मोदी इथे अदानींविरोधात काहीच करत नाही आणि करूनही शकत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
अदानी यांनी संपूर्ण देश हायजॅक केला आहे. घोटाळ्यानंतरही अदानी तुरुंगाच्या बाहेर कसे? छोट्या गुन्हेगारांना लगेच तुरुंगात टाकलं जातं. पण अदानी इतक्या दिवसांपासून तुरुंगाच्या बाहेर आहेत. या सरकारवर अदानींचा संपूर्ण कंट्रोल आहे. अदनी यांनी हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या गुंतवणूकदारांना खोटं सांगितलं आहे. यामुळे अदानींना अटक करून त्यांची चौकशी करावी. आणि या प्रकरणात जे सामील आहेत त्यांनाही अटक करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
अदानी रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण फंडिंग एजन्सीच्या हातात आहे. यामुळे पंतप्रधान मोदी इच्छा असूनही त्यांना अटक करू शकत नाही. अदानींना अटक करण्याची पंतप्रधान मोदींची हिंमत नाही. ज्या दिवशी मोदी असं करतील त्या दिवशी मोदीही जातील, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.