तुम्हीही ATM मधून पैसे काढत असाल तर लवकरच तुमच्या खिशावर अधिक परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँक ग्राहकांसाठी शुल्क आणि ATM इंटरचेंज फी मोफत पाच व्यवहार मर्यादेपेक्षा अधिक वाढवण्याच्या तयारीत आहे.
रोख रक्कम काढण्यासाठी अधिक शुल्क?
हिंदू बिझनेसलाइनच्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) 5 विनामूल्य व्यवहारांनंतर ग्राहकांकडून रोख रक्कम काढण्यासाठी कमाल शुल्क 21 रुपयांवरून 22 रुपये करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय NPCI ने ATM इंटरचेंज शुल्कवाढ करण्याचा ही प्रस्ताव ठेवला आहे. कॅश ट्रान्झॅक्शनसाठी इंटरचेंज फी 17 रुपयांवरून 19 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे.
ATM इंटरचेंज चार्ज म्हणजे काय?
खरं तर ATM इंटरचेंज चार्ज म्हणजे एखादी बँक दुसऱ्या बँकेचे ATM वापरण्यासाठी भरणारी रक्कम. या शुल्काचा परिणाम सहसा ग्राहकावर होतो, कारण बँक ही रक्कम ग्राहकाकडून घेते.
ग्रामीण आणि शहरी भागात खर्च वाढेल
NPCI च्या या प्रस्तावाला बँका आणि व्हाईट लेबल ATM ऑपरेटर्सनी सहमती दर्शवली आहे. ही वाढ केवळ महानगरांपुरती मर्यादित राहणार नसून लहान शहरे आणि ग्रामीण भागातही लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) इंडियन बँक्स असोसिएशनचे (IBA) सीईओ, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने बँकिंग क्षेत्राच्या खर्चाचे मूल्यमापन करून ही शिफारस केली होती.
वाढत्या खर्चामुळे निर्णय?
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ATM चालकांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन वर्षांत ग्रामीण आणि निमशहरी भागात ATM चालविण्याचा खर्च वाढला आहे. वाढती महागाई, चढे व्याजदर, रोकड भरण्याचा वाढलेला खर्च आणि वाढता अनुपालन खर्च ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
रिझर्व्ह बँक आणि NPCI कडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नसले तरी या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास ATM मधून पैसे काढणाऱ्यांना खिशातून अधिक पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे.
लक्ष्यात घ्या की, कॅश ट्रान्झॅक्शनसाठी इंटरचेंज फी 17 रुपयांवरून 19 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे.