शिर्डी : साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्यांची हत्या झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांचा ड्युटी टाईम बदलण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र दोन कर्मचार्यांच्या मृत्युनंतर संस्थान जागे झाल्याची चर्चा शिर्डीत सुरू आहे.
सुभाष घोडे व नितीन शेजुळ या दोन संस्थान कर्मचार्यांची सोमवारी पहाटेच्या सुमारास झाली. पोलिस मारेकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी मागमूस शोधत आहेत.कर्मचारी हिताच्या दृष्टीकोनातून रात्रीचा प्रवास टाळण्याकरीता ड्युटी वेळेत बदल करण्यात येत असल्याचे परिपत्रक संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी काढले आहे. प्रसादालय, शैक्षणिक संकुल आणि मंदिर विभाग वगळता इतर सर्व विभागाच्या वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थानच्या या निर्णयामुळे कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. काही लोक कर्मचार्यांना धमकी देतात, तसेच कामात अडथळा आणत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कर्मचार्यांना पाठबळ देण्यासाठीही संस्थानने उपाययोजना करावी, अशी मागणी आता पुढे येवू लागली आहे. सुरक्षा कर्मचार्यांसह इतर विभागातील कर्मचार्यांना संस्थानने पाठबळ दिल्यास भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असा दावा केला जात आहे.
बदलानंतरचा ड्युटी टाईम
पहिली शिफ्ट : सकाळी 6 ते 2
दुसरी शिफ्ट : दुपारी 2 ते रात्री दहा
तिसरी शिफ्ट : रात्री 10 ते सकाळी 6
जनरल शिफ्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 6
बायोमेट्रिक संगणक प्रणालीत नव्या टाईमिंगची
नोंद घेण्याचे आदेशात म्हटले आहे.