दसरा मेळाव्याला मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाज एकत्र राहणार उपस्थित file photo
Published on
:
10 Oct 2024, 5:11 am
Updated on
:
10 Oct 2024, 5:11 am
बीड : बीडच्या सावरगाव घाट येथे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये गत दहा वर्षापासून दसरा मेळावा होतो. या मेळाव्याला आतापर्यंत धनंजय मुंडे हे कधीही उपस्थित राहिले नव्हते. परंतु आता प्रथमच धनंजय मुंडे या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे.
बीड जिल्ह्यात यावेळी दोन दसरा मेळावे लक्षवेधी होणार आहेत. यामध्ये नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे. याबरोबरच भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेला दसरा मेळावा देखील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या मेळाव्यात आज पर्यंत पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थितीत असायची. धनंजय मुंडे कधीही या मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते. परंतु यंदा प्रथमच धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंडे बहिण भाऊ या मेळाव्यातून काय बोलतात आणि आगामी राजकीय दिशा कशी स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.