काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा फडणवीस यांना भेटले होते. या दोन भेटीनंतर भाजप आणि ठाकरे गट जवळ येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच नातं कसं आहे? त्या बद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या. “उद्धव ठाकरेंसोबत संबंध फार खराब अशी परिस्थिती नाही. पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी सुद्धा स्थिती नाही” असं सांगितलं.
लोकसत्ताच्या मुलाखतीत त्यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सौहार्दाचे संबंध तयार होतायत अशी चर्चा आहे, ही कितपत खरी, कितपत खोटी, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस गमतीने म्हणाले इथे मिलिंद नार्वेकर बसलेत त्यांना माहिती असेल. “उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. त्या व्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. दक्षिण भारतात नेते ज्या प्रमाणे एकमेकांच्या जान के प्यासे तशी स्थिती महाराष्ट्रात नाही. संबंध खूप खराब आहेत, अशी स्थिती नाही. पण म्हणून आम्ही जवळ येतोय, त्यांना सोबत घेणार अशी काही स्थिती नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
वर्षावर अजून का शिफ्ट झाले नाही? त्यामागचं कारण सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला कधी जाणार? असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून सातत्याने विचारला जातोय. “कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत” असा दावा काल संजय राऊत यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुलीची 10 वी ची परिक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे’ “शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी-मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी १० व्या वर्गात आहे, 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होत आहे. ती म्हणाली परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.