Published on
:
05 Feb 2025, 11:14 am
Updated on
:
05 Feb 2025, 11:14 am
धुळे | दारू पिण्यासाठी नातेवाईक महिलेने पैसे दिले नाही, या रागातून नराधम बापाने आपल्या पोटच्या दोन लेकरांना तापी नदीच्या पाण्यात फेकून ठार मारल्याचा खळबळ जनक प्रकार धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे घडला आहे. या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थाळनेर येथील कुंभार टेक भागात सुनील नारायण कोळी हे राहतात. त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. या कारणामुळे छायाबाई संजय कोळी आणि त्यांच्यात नेहमी वाद होण्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान दारू पिण्यासाठी त्यांनी नातेवाईक असलेल्या छायाबाई कोळी यांच्याकडून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सुनील कोळी यांनी मुलगा कार्तिक सुनील कोळी (वय पाच वर्ष )आणि मुलगी चेतना सुनील कोळी ( वय तीन वर्ष ) या दोघांना सोबत घेतले. रागाच्या भरात त्यांनी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात या दोन्ही मुलांना फेकून दिले. यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. ही बाब निदर्शनास आल्याने काही लोकांनी तातडीने हालचाली करीत दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मयत मुलांना शिरपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर छायाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुनील कोळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान थाळनेर पोलिसांनी फरार झालेल्या सुनील कोळी याला अटक करण्यासाठी पथक तयार केले असून त्याचा धुळे जिल्ह्यातील संशयित ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मद्यपी बापाने आपल्या मुलांचा खून केल्याच्या या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.