रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 790 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 पर्यंत 16 लाख 82 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. Pudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 6:29 am
Updated on
:
21 Nov 2024, 6:29 am
रायगड : जिल्हयात बुधवारी (20 नोव्हेंबर) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, उरण, श्रीवर्धन आणि महाड या सात विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात निवडणुकीचे मतदान पार पडले. रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 790 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 पर्यंत 16 लाख 82 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी प्रशासनाने मतदारांसाठी विविध सुविधा केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना रांगेत ताटकळत न ठेवता त्यांना प्राधान्याने मतदान करण्यासाठी पाठविले जात होते.
रायगड जिल्ह्यात बुधवारी (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीचे मतदान अमाप उत्साहात, कोणत्याही प्रकारचा गडबड-गोंंधळ न होता शांततेत पार पडले. नवमतदार, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनिच मतदानाचा हक्क बजावत आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत हे दाखवून दिले. जिल्हयातील सर्वच मतदान केंद्रात लागलेल्या रांगा, उत्साहाने येणारे मतदार, त्यांचे स्वागत करणारे कार्यकर्ते, ज्येष्ठ व अपंगांना मतदान केंद्रापर्यंत सुरक्षितपणे ने-आण करणारे स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी असे आशादायी चित्र बुधवारी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर दिसून आले. सायंकाळपर्यंत जिल्हयात शांततेत मतदान प्रक्रिया पडली.
गेली अनेक महिने जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये नवा उत्साह असून प्रशासनाच्या मतदार जनजागृतीला यश आल्याचे पहायला मिळत होते. पनवेल येथील वेगवेगळ्या थिम आधारी विशेष मतदान केंद्रांमुळे यावेळी मतदान प्रक्रियेत वेगळेपण दिसून आले.
जिल्हयातील 2 हजार 790 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. सायंकाळपर्यंत जिल्हयात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर पलीकडे राजकीय पक्षांचे बुथ लावण्यात आले होते. या बुथवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गर्दी करून होते. मतदानासाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कार्यकर्त्त्यांकडून होत होता. जिल्हयातील सर्वच विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक चुरशीची असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी सर्वत्र दिसून आली.
रायगड जिल्हयातील सातही विधानसभा मतदारसंघात रायगड पोलीस विभागाकडून अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल, आदींची तैनाती होती. मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याासाठी पोलीस, गृहरक्षक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरु होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत जिल्हयात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. 2 हजार 790 मतदान केंद्रांपैकी सुमारे 1 हजार 600 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रण होती.
तर मोबाईल फोनच्या कनेक्टीव्हीटीची अडचण असलेल्या 49 केंद्रांवर सॅटेलाईट फोनचा वापर करण्यात आला. मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी, पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासाठी प्रशासनान पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाष्ता आदी सुविधा दिल्या होत्या.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळसह दुपारच्या सुमारासही विशेष तापमान वाढ नसल्याने मतदारांना मतदान केंद्रांवर उभे राहताना त्रासदायक ठरले नाही. काही मतदान केंद्रावर मंडप नसल्याने व उन्ह पडल्याने काही ठिकाणी मंडपाची व्यवस्था करावी लागली. जिल्हयात दुपारी 3 वाजेपर्यंत सात मतदारसंघात एकूण 48.13 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कर्जत तालुक्यात (55.8 टक्के) तर सर्वात कमी पनवेल तालुक्यात (41.79 टक्के) मतदान झाले होते. मतदानाची वेळेपर्यंत जिल्हयात सुमारे 70 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 24 लाख 88 हजार 788 मतदारांपैकी 67.6 टक्के म्हणजेच सुमारे 16 लाख 82 हजार मतदारांनी मतदान केले होते.
ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार
श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते, अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या शिस्ते येथे नवीन मशीन बसविले, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरु झाली होती. जिल्हयात इतर मतदान केंद्रांवर ईव्हीएमबाबत मोठ्या तक्रारी निर्माण झाल्याची नोंद नाही.
अलिबागमध्ये मतदाराला भोवळ
जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर सकाळपासून लांबच लांब रांगा लागल्या होता. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागत होते. अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा येथील एक मतदान केंद्रावर संदीप सिंग या मतदाराला भोवळ आल्याने ते खाली पडले. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार केल्यानंतर सिंग यांच्या प्रकृतित सुधारणा झाली. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय गावडे यांनी सांगितले.
बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी (23 नोव्हेंबर रोजी) त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. रायगड जिल्हयात सध्या शिवसेना शिंदे गटाचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)चे एक आमदार आहे. या निवडणुकीने विद्यमान आमदार आपले मतदारसंघात आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवितात की विरोधी उमेदवार बाजी मारतात, याबाबत सर्वत्र उत्सुकता असून 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.