जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. Pudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 7:08 am
Updated on
:
21 Nov 2024, 7:08 am
ओरोस : जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघातील एकूण 17 उमेदवारांचे राजकीय भवितव्य बुधवारी (दि.20) मतदान यंत्रात बंद केले. यासाठी शांततापूर्ण वातावरणात उत्स्फूर्तपणे बुधवार (दि.20) सायंकाळी 6 वाजेपर्यत सरासरी 72 टक्के मतदान झाले.
बांदा-सटमटवाडी येथील मतदारांनी काही तास मतदानावर बहिष्कार घालण्याचा प्रकार वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र नेहमीप्रमाणे मतदार याद्यांच्या घोळाचे प्रकार प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून येत होते. सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. गेल्या विधानसभेपेक्षा यावेळी वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरणार हे आता शनिवारी, दि. 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात बुधवारी पार पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघात बुधवार (दि.20) सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडत उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर पहिल्या टप्प्यात मशीन बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या परंतु त्या तात्काळ मशीन दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आ. नितेश राणे यांनी वरवडे-फणसवाडी तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर,राजन तेली,विशाल परब,अर्चना घारे-परब या उमेदवारांनी आपआपल्या भागातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.तर कुडाळ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आ.वैभव नाईक यांनी कणकवली शहरातील मतदान केंद्रावर तर महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी कणकवली वरवडे-फणसवाडी मतदान केेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
दुपारच्या सत्रात मतदारांचा मतदानासाठी काहीसा कमी प्रतिसाद होता परंतु बुधवार (दि.20) दुपारी 3 वा.नंतर पुन्हा सर्वच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा आणि गर्दी दिसत होती. यावेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबई,पुणे, गोवा व अन्य राज्यात स्थायिक झालेले जिल्ह्यातील मतदार मतदानासाठी आपआपल्या गावी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यामुळे 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टकक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासूनचा मतदार यांद्यामधील घोळ या निवडणुकीतही दिसून आला.
सरासरी मतदानाची टकक्केवारी
जिल्ह्यात बुधवार (दि.20) सकाळी 7 ते दुपारी 11 या वेळेपर्यंत एकूण 23.2 टकक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कुडाळ विधानसभा मतदारसंघात 25. 47 टक्के ,कणकवली मतदारसंघात 21.22 टक्के तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 22.53 टक्के एवढे मतदान झाले आहे.
बुधवार (दि.20) दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 42.21 टक्के एवढे मतदान झाले. यामध्ये सर्वात अधिक कणकवली मतदारसंघात 45.11 टक्के, कुडाळ मतदारसंघात 42.26 टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात 39.24 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कणकवली मतदारसंघात 57.03 टक्के, कुडाळ 55. 99 टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात 52.95टक्के मतदान झाले.सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 67 .60 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 67.46 टक्के ,कुडाळ मतदारसंघात 68.85टक्के तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 66. 56 टक्के एवढे मतदान झाले.