Published on
:
17 Nov 2024, 5:48 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:48 am
ठाणे : विधानसभा मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ व परिसरावर ड्रोन कॅमेर्याची नजर राहणार आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बल ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहेत. तर गुंड प्रवृत्तीच्या सुमारे दीड हजार व्यक्तींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर येत्या दोन दिवसात आणखी हजाराहून अधिक उपद्रवी गुंडांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून मतदान केंद्र परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तीन अपर पोलीस आयुक्त, 9 पोलीस उपायुक्त, 18 सहाय्यक पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकार्यांसह सुमारे 9 हजार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे भरारी पथके, उत्पादन शुल्क भरारी पथक, सायबर सर्व्हेलियन्स, व्हिडीओ सर्व्हेलियन्स असे विविध पथके देखील या मतदान प्रक्रियेवर आपली करडी नजर ठेवून राहणार आहेत.
भरारी पथक व मतदान प्रक्रियेत सहभागी होणार्या इतर सर्व प्रशासकीय पथकांसाठी एक हजाराहून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या मतदान केंद्रावर सिसिटीव्हीची नजर राहणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात ड्रोन कॅमेर्याने गस्त घातली जाणार असून त्याद्वारे पोलीस संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवून राहनार आहेत. पोलीस यंत्रणे प्रमाणेच निवडणूक प्रशासनाने देखील या मतदान प्रक्रियेसाठी मोठया प्रमाणात मनुष्यबळाची नेमणूक केली आहे. तसेच मतदान वेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मतदाराला आपल्या वाहनातून घेऊन जाता येणार नाही, तोच वाहन पुन्हा त्याच मतदान केंद्रावर दिल्यावर ते जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र थांबता येणार नसल्याचे देखील।पोलिसांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चाचा व्यवहार करण्यासाठी उमेदवाराला बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक केले आहे. या बँक खात्यामार्फत करण्यात आलेल्या व्यवहाराचा तपशील खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. आचार संहिता काळात मोठी आर्थिक उलाढाल करणार्या व संशयास्पद बँक खात्यावर पोलिसांनी आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ऑनलाईन बँकिगच्या माद्यमातून होणार्या आर्थिक हेराफेरीवर देखील पोलिसांच्या सायबर सेल विभागाची करडी नजर असून ऑनलाईन बँकिंगच्या माद्यमातून होणार्या आर्थिक व्यवहारावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. बँक खात्यातून मोठी रक्कम काढणार्या व संशयास्पद खात्यांची माहिती संनियंत्रण कक्षास अथवा पोलिसांना देण्याचे आवाहन देखील पोलिसांच्या आर्थिक विभागाने बँकांना केले आहे.
निवडणुक प्रचारात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवारांनी विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले ग्रूप, पेज तयार केले असून, त्यावर प्रचार- प्रसार करण्यात येत आहे. सोशल मीडिया निवडणूक प्रचाराचे प्रभावी माध्यम मानले जात असून, सर्व राजकीय पक्ष याचा वापर करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सोशल मीडियाकडे आपली नजर वळविली आहे. निवडणुकीत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर प्रचार करण्याकरिता निवडणूकआयोगाकडून मंजुरी आवश्यक आहे. निवडणुकांसाठी आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. ही आचारसंहिता सोशल मीडियालाही लागू राहणार आहे. उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार करण्याकरिता सोशल मीडियावर टाकण्यात येणार्या ध्वनिफीत व चित्रफितीसाठी निवडणूक आयोगाकडून परवागनी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता प्रचार करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालण्यासाठी 40 ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे.Pudhari News Network
एकीकडे विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याने कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालण्यासाठी 40 ड्रोनची व्यवस्था केली आहे. अत्याधुनिक ड्रोन कॅमेर्यांचे कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा पोलिसांनी विविध भागांमध्ये शनिवारी टेस्ट रन केले.येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे सार्वत्रिक मतदान होणार असून त्याला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत.पया पार्श्वभूमीवर मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि आचारसंहिता निर्धोकपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन देखिल सज्ज झाले आहे.त्यासोबतच आता ड्रोन कॅमेर्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही गस्त घालण्यासाठी मदत घेतली जात आहे. खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठी 5 ड्रोन कॅमेरे तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. तसेच खडकपाडा परिसरातील साई चौक, कैलाश पार्क, आदी ठिकाणी शनिवारी ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले.