सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून 48 तासाच्या शांतता कालावधीला सुरुवात
हिंगोली (Hingoli Assembly Elections 2024) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून निर्भय व पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रमाणे (Assembly Elections 2024) विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम 163 लागू होईल, याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, सोशल मीडिया, इलेक्ट्रानिक मीडियामध्ये आवाहन करता येणार नाही, जाहिराती देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय एकूण मतदार
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत (Assembly Elections 2024) विधानसभा मतदारसंघात (320765), 93-कळमनुरी (330686), 94- हिंगोली (333313) असे जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून यामध्ये पुरुष 5 लक्ष 10 हजार 393 तर महिला 4 लाख 74 हजार 361 तर तृतीयपंथी 10 मतदाराचा समावेश आहे.
1 हजार 15 मतदान केंद्र; 1 संवेदनशील
जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण 1 हजार 15 आहे तर 681 मतदान केंद्रांची ठिकाणे आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 78 व ग्रामीण 603 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100 टक्के मतदान अधिकारी महिला असलेले, 100 टक्के मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100 टक्के मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 3 आहेत. याशिवाय जिल्ह्यात 1 संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये 92-वसमत मधील किन्होळा मतदान केंद्राचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा यंत्रणा तैनात राहणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील (Assembly Elections 2024) निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी प्रशिक्षित सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे.
बुथ व्यवस्थापन महत्त्वाचे
यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.
कडेकोट बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठिकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.
मोबाईल वापरावर बंदी
मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांना अधिकार दिले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक सुटी किंवा दोन तासाची सवलत
20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ (Assembly Elections 2024) मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरू असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे.
48 तास मद्य विक्री बंद
कायदा सुव्यवस्थेसाठी सोमवारच्या सायंकाळी सहा वाजतापासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.
रेडिओ संदेश बल्क एसएमएस, सोशल मिडीया प्रसिद्धीस बंदी
48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी, सोशल मीडियावरील व खाजगी चॅनलवरील (Assembly Elections 2024) निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
पुढील बाबींवर प्रतिबंध असणार नाही
घरोघरी प्रचार करता येईल तथापि ही संख्या पाच पेक्षा जास्त नसावी. रुग्णालयाच्या गाड्या, ॲब्युलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर, विद्युत विभाग, पोलीस निवडणूक कर्मचाऱ्यांचे व निवडणूक कर्मचाऱ्यांचे वाहन, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्या, शाळेला जाणारी वाहने यावर बंदी असणार नाही.