हिंगोली(hingoli):- सेनगाव तालुक्यातील सवना ते ब्राम्हणवाडा रस्त्यालगत असलेल्या शेतातील आखाड्यावर बेकायदेशीररित्या १ लाख ६३ हजाराचे ३४ देशी दारूचे बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
विधानसभा निवडणूक(Assembly Elections) मतदानाला अवघे दिवस राहिले आहेत. त्या निमित्ताने जिल्हाभर ड्रायडे(dry day) घोषित करण्यात आला. मतदान प्रक्रियेकरीता अनेक ठिकाणी दारूचा वापर केला जात असल्याने सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस यंत्रणेला यापूर्वीच दिल्या होत्या. सेनगाव तालुक्यातील सवना ते ब्राम्हणवाडा रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील आखाड्यावर मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १८ नोव्हेंबरला मिळाल्याने त्यांनी तात्काळ सवना येथील गजानन पंढरीनाथ नायक यांच्या शेतातील आखाड्यावर छापा मारला. यावेळी पथकाने पाहणी केली असता टीन पत्राच्या शेडमध्ये ३४ देशी दारूचे बॉक्स विना परवाना साठवणूक केल्याचे दिसून आले. पोलिसांनी ३४ बॉक्समधील १ लाख ६३ हजार २०० रूपयाच्या १६३२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गजानन पंढरीनाथ नायक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, निरंजन नलवार, गजानन पोकळे, पांडूरंग राठोड, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने केली आहे.