हिंगोली(Hingoli):- शहरासह परिसरात दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलिसात परस्पराविरूद्ध तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटातील आरोपींची धरपकड करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज पाहणी नंतर या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
ऐन मतमोजणीच्या दिवशी दोन गटातील राडा
हिंगोली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सुरू असताना दुपारी ३.३० च्या सुमारास औंढा रस्त्यावरील कयाधू नदीच्या पुलावर मारहाणीची घटना घडली. सदर प्रकरणात आसराजी उर्फ पप्पू चव्हाण यांनी हिंगोली शहर पोलिसात रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये पप्पू चव्हाण यांच्या वाहनावर आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा व बुक्याने मारत असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या साथीदारांनी तुम्ही वाहनावर लाथा बुक्या का मारता..? अशी विचारणा केली असता साक्षीदारास आरोपी मारहाण करीत असल्याने चव्हाण हे घाबरून वाहन मागे घेत असताना चेतन नागरे व करण बांगर या दोघांनी पिस्टल काढून पप्पू चव्हाण व साक्षीदारास धमकावत होते.
आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली
पप्पू चव्हाण यांच्या बळसोंड भागातील राहत्या घरी अनेक आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्या घराच्या काचा फोडून दोन चार चाकी वाहनांच्या काचा व बोनटवर दगड मारून नुकसान केले आणि पप्पू चव्हाण यांचा भाऊ संजयला तलवारीने हातावर, मानेवर, डोक्यावर व पाठीवर मारून जखमी केल्याने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चेतन सुदाम नागरे, अजय सुदाम नागरे, गोपाल बांगर, करण बांगर, चौधरी, सांगळे यांच्यासह ६० ते ७० जणांवर विविध कलमान्वये दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे २४ नोव्हेंबर रोजी हिंगोली ग्रामीण पोलिसात विशाल रामा आठवले रा.खडकपुरा यांनी रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये विशाल आठवले हे मोटारसायकलने लिंबाळा येथे जात असताना तू गाडी सरळ चालव, असे म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ करून आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली.
जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात गोळी मारून केले जखमी
याबाबत आठवले व साक्षीदार शिवीगाळ का केली, अशी विचारणा करण्याकरीता पप्पू चव्हाण यांच्या बळसोंड भागातील घरी गेले असता तुम्ही येथे कसे काय आले असे म्हणून त्यांना मारहाण (beating) करून त्यांच्या तोंडावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लोखंडी रॉडने पायावर मारून जखमी केल्यावर लखन चौधरी यास डोक्यावर शॉकअपने मारहाण केली. करण बांगर यास लाकडी दांड्याने मारहाण करून पप्पू चव्हाण याने हातातील बंदुकीने गौरव यास जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात गोळी मारून जखमी केले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पप्पू चव्हाण, अमोल देशमुख, विवेक देशमुख, राजू जोजार, विकास जोजार, केशव तनपुरे रा.हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे हे करीत आहेत.
मारहाण प्रकरणात जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाण प्रकरणात जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. हे दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली शहर ठाणे व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह अन्य पोलीस पथकाने घटनास्थळासह विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी केल्यानंतर धरपकड मोहीम केली. ज्यामध्ये दोन्ही गटातील अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही आरोपी फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
दोन गटामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीत पिस्टलचा उल्लेख केला असल्याने शस्त्र कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.