बिबट्यांचा मृत्यू Pudhari photo
Published on
:
18 Nov 2024, 8:10 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:10 am
नाशिक : शहर, जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या मृत्यूसंख्येने पर्यावरणप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे. काही मृत्यू हे नैसर्गिक झाले असले, तरी बिबट्यांच्या हत्यादेखील केल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या असल्याने, यामागचे सूत्रधार त्वरित शोधून काढावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगरमध्ये के. के. वाघ कृषी महाविद्यालय परिसरातील विहिरीत 20 ऑक्टोबरला तार, दगड, सिमेंट पोल बांधून विहिरीत मृतावस्थेत बिबट्या आढळला होता. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकार्यांनी भेट देत शोध सुरू केला होता. बिबट्याचे शवविच्छेदन करून, अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा व्हिसेरा प्राप्त न झाल्याने वनाधिकार्यांच्या तपासात अडथळा येत होता. अद्यापही या बिबट्याचे मारेकरी मोकाट फिरत असून, वनअधिकारी त्यांच्या मागावर आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारचे धागेदोरे अद्यापपावेतो त्यांच्या हाताला लागलेले नाहीत.
दुसर्या घटनेत नाशिक पश्चिम वनविभागाच्या अंतर्गत येणार्या विल्होळी अन् पिंपळद शिवारात दोन बिबट्यांचा मृत्यू एकाच वेळीस उघडकीस आल्याने खळबळ उडाली. विल्होळी शिवारातील बिबट्याचा मृत्यू आपापसातील झुंजीनंतर कुपोषणाने, तर पिंपळद शिवारातील बिबट्याचा मृत्यू शिकारीचा पाठलाग करताना उघड्या विहिरीत पडून झाल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले.
वनविभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बिबट्यांच्या झुंजीत दोन ते अडीच वर्षांचा बिबट्या जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला शिकार न मिळाल्याने त्याचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. दुसर्या घटनेत पिंपळदमध्ये पाची डोंगराच्या पायथ्याशी फडोळ मळ्यात शिकारीसाठी रानडुकराच्या मागे धावताना 4 ते 5 वर्षे वयाचा नरबिबट्या विहिरीत कोसळला. बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने पाण्यातच बुडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकार्यांनी दिली. एकामागून एक झालेल्या बिबट्यांच्या मृत्यूने पर्यावरणप्रेमी चिंतेत असून, बिबट्यांच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
बिबटे आपला नैसर्गिक अधिवास सोडून शहराकडे धाव का घेत आहेत, हा मूळ प्रश्न असून, त्याचा सखोल अभ्यास व्हावा. त्यादृष्टीने वनविभागाने कारवाई करायला हवी. तरच या हत्या थांबतील. मानेनगरमधील हत्येमागील आरोपींचा त्वरित तपास व्हावी, अशी आमची मागणी आहे.
निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी
शिकार केल्यानंतर बिबट्यांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ ते शहराकडे येतात. यासाठी वनविभागाने सोय करायला हवी. तरच ते जंगलात राहतील. एकामागून एक होणार्या बिबट्यांच्या मृत्यूमुळे चिंता निर्माण झाली असून, हत्या करणार्यांना कडक शिक्षा व्हायला हवी.
राजेश पंडित, पर्यावरणप्रेमी