Published on
:
21 Nov 2024, 11:50 am
Updated on
:
21 Nov 2024, 11:50 am
परळी, पुढारी वृत्तसेवा : परळी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान चांगलाच राडा झाला. जिरेवाडी येथील मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. माधव जाधव यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याचे पडसाद घाटनांदूर येथे उमटले. त्या ठिकाणी अॅड. जाधव यांच्या समर्थकांनी तीन मतदान केंद्रावरील तसेच चोथेवाडी, मुरंबी व जवळगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची तोडफ ोड केली. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख अशी सरळ लढत होती. या लढतीपूर्वीच राजेसाहेब देशमुख यांनी बोगस मतदान रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तर धनंजय मुंडे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान सर्वच उमेदवारांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी पोलिस अधिक्षकांकडे पत्राद्वारे केली होती. मतदान प्रक्रिया सुरु होताच धर्मापुरी येथे सीसीटीव्ही कॅमेरा बंद करुन मतदान सुरु असल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला होता. तसेच जलालपुर येथील मतदान केंद्रावरही महिलांना रोखल्याचे देशमुख यांनी म्हटले. यानंतर काही वेळातच जिरेवाडी येथील मतदान केंद्राबाहेर अॅड. माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. हे कार्यकर्ते धनंजय मुंडे जिंदाबाद अशा घोषणा देत होते.
या घटनेचे पडसाद काही वेळातच घाटनांदुर येथे उमटले. त्या ठिकाणी अॅड. जाधव यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात मोठी तोडफोड केली. ईव्हीएम मशीनही यात क्षतीग्रस्त झाली. यानंतर मतदान केंद्राबाहेर धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या बन्सीअण्णा सिरसाट यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. जवळच असलेल्या चो- थेवाडी, मुरंबी, जवळगाव येथील मतदान केंद्रातही अशाच पद्धतीने तोडफोड करण्याचा प्रकार घडला.
यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत मतदान प्रक्रिया सुरळीत केली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी याबाबत आढावा घेत सकाळपासून जे मतदान या केंद्रांवर झाले होते ते नोंदवले गेले असून उर्वरित मतदान प्रक्रियाही सुरळीत सुरु असल्याची माहिती दिली. यामुळे मतमोजणीत कोणताही अडथळा येणार नाही असे दिसते. दरम्यान, आता या दोन्ही घटनानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.