नांदेड, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटकाच्या सीमेववरील उजाड माळरानावर वसलेल्या मुखेडमध्ये शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत आणणाऱ्या राठोड कुटुंबाचा वारसा डॉ. तुषार राठोड यांच्या रुपाने जपू या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. महायुतीच्या प्रचारार्थ खा. चव्हाण यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ कंधार फाटा येथे एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खा. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात खा. चव्हाण यांनी भाजप प्रणित एनडीएने केंद्रात मागील दहा वर्षात केलेल्या कामांचा उहापोह केला. तसेच राज्यात महायुती सरकारने जनहितार्थ राबविलेल्या योजनांची जंत्री मांडली.
खा. चव्हाण म्हणाले, भाजप महायुतीकडे विकासाचे व्हिजन आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसीत करून विश्वगुरु बनविण्याचा टास्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना दिला आहे. तरुणवर्ग झपाट्याने त्या दिशेने मार्गक्रमण करीत असून संपूर्ण देशाचा चेहरामोहरा प्रत्येक क्षेत्रात बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रस्त्यांचे जाळे वेगाने विणले जात आहे. महाराष्ट्रातील रस्ते अतिशय सुरेख व रुंद झाल्याचे बहुतेकजण अनुभवत असून दिवसातून कितीतरी वेळा नितीन गडकरीचे नाव घेऊन त्यांना त्याचे श्रेय दिले जाते.
रेल्वेमध्ये सुद्धा ना. अश्विनी वैष्णव जिद्दीने काम करताना दिसतात. आपली बंदे भारत ट्रेन आपण अन्य देशांत निर्यात करीत आहोत, यावरुन त्याच्या दर्जाची कल्पना यावी. याशिवाय महानगरांमध्ये मेट्रोची कामे अतिशय वेगाने सुरु आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर येथे मेट्रो धावते आहे. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. महिलांसाठी विविध प्रकारच्या १४ योजना भाजप महायुती सरकार राबवत आहे. येत्या काळात आणखीही वैयक्तिक तसेच सार्वजनिक लाभाच्या योजना दृष्टीपथात असून त्यांना साकार करण्यासाठी डॉ. संतुकराव हंबर्डे आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड यांच्या नावासमोरील कमळ या निशाणीचे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
या बैठकीला गंगाधर राठोड, बालाजी पाटील सकनुरकर, अशोक गज्जलवाड़, डॉ. विरभद्र हीमगिरे, व्यंकट लोहबंदे, अशोक गज्जलवाड, नागनाथ लोखंडे, बालाजी नाईक कलंबरकर, विजय पाटील सुगावकर, डॉ. व्यंकट सुभेदार, डॉ. रणजित काळे, गौतम काळे, खुशाल पाटील उमरदरीकर, करण रोडगे, विनोद दांडलवाड, नारेरखान पठाण, संजय रावनगाकवकर, उत्तम बनसोडे, किशोर चव्हाण, बवन ठाकूर सचिन श्रीरामे, शिवकुमार बंडे, दत्ता पाटील बेटमो गरेकर आदीसह अनेक जण उपस्थित होते.