डायमंड हॉल येथे नवमतदारांसोबत संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड.Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 9:23 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:23 am
ठाणे : तू तारी तर आम्हाला कोण मारी, अशी घोषणा देत नवमतदारांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची डायमंड हॉल येथे नवमतदारांनी भेट घेतली. मर्जिया पठाण यांच्या एमएसपी केअर फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 18 ते 25 वयोगटातील हजारो नवमतदार उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आधीचा मुंब्रा आणि आताचा मुंब्रा यातील फरक जाणवतोय ना? चौपाटी, रूग्णालय, शादीखाना, होस्टेल, रस्ते असे सर्वकाही मुंब्र्यात उभे करण्यात आपणाला यश आले आहे. हे यश फक्त इथल्या जनतेच्या सहकार्यातूनच आले आहे. आता जे सरकार सत्तेत आहे ते द्वेषाचे राजकारण करीत आहे. आपल्या लोकांना शांततेत जीवन जगायचे आहे. द्वेषाचे विष लोकांच्या डोक्यात कालवून ज्या पद्धतीने विशाळगड-गजापुरात दंगल माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याकडे पाहता हा देश अधिकाधिक अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात लढण्यासाठी मला साह्य करणार का? , असा सवाल केला. त्यावेळेस तरूणांनी उत्स्फूर्तपणे , तु तारी तर कोण मारी! अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. आम्हाला सामाजिक शांतता हवी आहे. या शांततेची निशाणी तुतारी आहे, असे म्हणत डॉ.जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता मुंब्रा-कळवा मतदार संघात प्रचाराला वेग आला आहे.
आंबेडकरी जनतेने दिले समर्थन
आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. संविधाना वाचविण्याच्या लढाईत डॉ.जितेंद्र आव्हाड हे पुढाकार घेत आहेत. म्हणूनच आमचा नारा फिर से एक बार... एक नंबर असाच आहे, अशी घोषणा मुंब्रा खडीमशीन येथील आंबेडकरी वस्तीतील नागरिकांनी दिली. मुंब्रा खडी मशीन रोड येथील आंबेडकरी वस्तीतील शांताबाई कांबळे आणि श्रीमती सरकटे यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन केले होते. या ठिकाणी साधारणपणे 200 कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या कुटुंबांनी स्वतःहून बैठक घेऊन डॉ. जितेंद्र आव्हाड यांना सामूहिकपणे एकमताने मते देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासारख्या तमाम बहुजनांचे बाप आहेत. कारण, जर ते नसते तर आपणाला कुणालाच माणूस म्हणून जगताच आले नसते. फक्त दलित समाज नव्हे तर सबंध देशावर बाबासाहेबांनी उपकार केले आहेत. त्यांनी दिलेले संविधान बदलणार्यांना हाकलून लावण्याची जबाबदारी आपली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा अधिकार हजार रुपयांसाठी विकणे म्हणजे आपल्या बाबासाहेबांचे विचार विकण्यासारखेच आहे. तेव्हा प्रत्येकाने विचार करून संविधानविरोधकांना जागा दाखविणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यावेळेस उपस्थितांनी आव्हाड यांना उद्देशून, तुम्ही निर्धास्त रहा, दोनशे घरातील एकही मत दुसरीकडे जाणार नाही. आमचे मत तुम्हालाच आहे. मशीनवरचा एक नंबर आम्हाला माहित आहे, असे म्हणत फिर एक बार... एक नंबर अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण, बापू मखरे, प्रविण पवार शिवा जगताप आदी उपस्थित होते.