Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 9:43 am
Updated on
:
15 Nov 2024, 9:43 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज (दि.१५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाराष्ट्रासमोरचे प्रश्न आणि त्याची उत्तरे या स्वरूपात हा विस्तृत जाहीरनामा मांडला आहे. यात फक्त पुढच्या ५ वर्षांचा नाहीतर पुढील अनेक दशकांत महाराष्ट्राने कसा आकार घेतला पाहिजे, याबद्दलचे विवेचन करण्यात आले आहे. ‘आम्ही हे करू’ या नावाने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच, “आम्ही हे केलं” या पुस्तिकेतून त्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.
इतर पक्षांच्या जाहीरनाम्यात लोकप्रिय घोषणांचा भडिमार करण्यात आला आहे. परंतु मनसेच्या जाहीरनाम्यात अशा घोषणांना बगल देण्यात आली आहे. राज्याची आर्थिक पत पाहता अशा योजना कितपत योग्य आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. त्याऐवजी शाश्वत विकासांवर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, जंगल, पर्यावरण, आदीवासी, जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती, औद्योगिक धोरण, वैज्ञानिक संशोधन, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, शिक्षण, महिला सबलीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, शेती, सिंचन प्रकल्प, नद्या आदी मुद्द्यांचा परामार्श घेण्यात आला आहे.
पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याबाबत विवेचन केले आहे.
दुसरा भागात दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता यावर विश्लेषण केले आहे.
तिसरा भागात राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण यावर भर देण्यात आला आहे.
चौथा भागात मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात जागतिक स्तरावर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ याबाबत भाष्य केले आहे.