Published on
:
15 Nov 2024, 12:17 pm
Updated on
:
15 Nov 2024, 12:17 pm
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत पाच नागरिक जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चाकण, देहूरोड, रावेत आणि भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 9 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान हे अपघात झाले आहेत.
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर मेदनकरवाडी फाटा येथे 12 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. या प्रकरणी राहुल लक्ष्मण शिंगणकर (40, रा. चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमित महादेव जाधव (वय 21, रा. रासे फाटा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवनाथ आगरकर यांच्या गोठ्यावर कामाला आहे. ते नेहमीप्रमाणे गोठ्यातील शेण गाडीमध्ये भरून शिक्रापूर-चाकण रस्त्याच्या पलीकडे टाकत होते. त्या वेळी आरोपी भरधाव वेगात दुचाकीवरून येत होता. त्याने दुचाकीने फिर्यादी शिंगणकर यांना धडक दिली. या अपघातात आरोपी दुचाकीस्वार आणि फिर्यादी दोघेही रस्त्यावर पडले. यात फिर्यादी यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. तसेच, तोंडाला मार लागला. चाकण पोलिस तपास करत आहेत.
देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देहूगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या शेजारी राहणार्या कविता विष्णू गायकवाड पोस्ट ऑफिस येथे पायी चालल्या होत्या. त्या वेळी काळ्या रंगाची दुचाकी घेऊन आलेल्या दुचाकीस्वाराने फिर्यादी आणि कविता यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. या अपघातात फिर्यादी यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. दोहूरोड पोलिस तपास करत आहेत.
भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीएमटी चौक येथे 12 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. या प्रकरणी श्वेतेश अनिल पिंगळे (30, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएमपी चालक गणेश शंकर सपकाळ (31, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पिंगळे यांचे आई-वडील आपल्या इलेक्ट्रीक मोपेड दुचाकीवरून जात असताना आरोपी सपकाळ याने आपल्या ताब्यातील पीएमपी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचे आई-वडील दुचाकीवरून रस्त्यावर पडले. यात फिर्यादी यांच्या आईच्या पायाची बोटे मोडली. गुडघा, डाव्या पायाची मांडी, पोटरीला जखम झाली. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांनाही गंभीर दुखापत झाली. फिर्यादी यांचे आई-वडील यांना भोसरीतील जयहिंद रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजीराव कॉर्नर येथे 9 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. या प्रकरणी नितीन आनंद कुर्हाडे (44, रा. किवळे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरएमसी मिक्सर गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुर्हाडे त्यांच्या मुलीला घेऊन आकुर्डी ते मुकाई रस्त्याने चालले होते. त्या वेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मिक्सर गाडी वेगाने चालवत फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात फिर्यादी व त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. रावेत पोलिस तपास करत आहेत.