राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. “आज आमची काही लोकं वेगळ्या रस्त्याने गेली. दुर्दैवाने यात तुमच्याही जिल्ह्यातला व्यक्ती आहे. आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरायची असते. ते करत असताना जात-पात, धर्म बघायचा नाही. ही शिकवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली आहे. हे राज्य आता योग्य हातात द्यावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.
“आम्ही ताकद देत असताना कोण कुठल्या जातीचा धर्माचा आहे याचा कधीच विचार केला नाही. यातूनच हसन मुश्रीफ यांचं नाव समोर आलं होतं. अनेक वर्ष मी त्यांना साथ दिली, शक्ती दिली. त्यांच्यासाठी सभा घेतल्या. हा कोल्हापूर जिल्ह्यातली आहे, लहान समाजातला आहे, कष्ट करायची तयारी आहे म्हणून आम्ही त्यांना अनेकदा संधी दिली. मात्र आज दुर्दैवाने आमची साथ द्यायची सोडून बाहेर निघून गेले”, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
हसन मुश्रीफ शरद पवारांच्या कानात काय म्हणाले?
“हसन मुश्रीफ एक दिवस माझ्याकडे आले आणि मला म्हणाले आम्ही चाललोय. आमच्यासोबत चला. ज्यांच्या विरोधात लोकांनी तुला मतं दिली त्यांच्यासोबत कशासाठी जायचं? हाच एक प्रश्न मी त्यांना विचारला होता. यावर हसन मुश्रीफ मला कानात येऊन म्हणाले होते, आम्ही हा निर्णय घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल. ईडीच्या भीतीने आणि तुरुंगात जाऊ लागू नये म्हणून या लोकांनी हा सगळा उद्योग केला आहे”, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.
हे सुद्धा वाचा
“मंत्री छगन भुजबळ यांनी तर जाहीर सांगितलं आहे. एकदा तुरुंगात जाऊन आलोय. आत्ता भाजपसोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावं लागलं असतं. ज्यांचे हात बरबटलेले असतात, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच अशी भीती असते. माझ्यावर देखील ईडीकडून कारवाईचा प्रयत्न झाला होता. मात्र मी स्वतः ईडीकडे गेलो”, असं शरद पवार म्हणाले.
‘आपण झ* मारायची आणि…’
“ज्या बँकेचा सभासद देखील नव्हतो त्या बँकेतील गैरव्यवहाराच्या आरोप माझ्यावर केले गेले. ईडी कार्यालयात येतो म्हटल्यानंतर ईडीनेच माघार घेतली. लोकांनी निवडून दिलेल्याची बांधिलकी न जपता तुम्ही खुशाल निघून गेलात. कशात तरी हात गुंतले असतील, बरबटलेले असतील तरंच अशी भीती वाटते. ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवल्या आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले. काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार आहे”, असा घणाघात शरद पवारांनी केला.