मतदान करतांना जागृत नागरिक म्हणून मतदान करा
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (Prakash Pohare) : ५० खोके वाढून राज्यात शिंदे सत्तेत बसले आणि आता जी लूट सुरू आहे, हे तुम्ही आम्ही बघत आहोत. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आता गुंडागर्दीच्या संदर्भात बिहार आणि युपीच्या पुढे गेल आहे. त्यामुळे आता पुन्हा चुकीच्या हाती सत्ता दिली तर राज्यात काय होऊ शकते, हे दिसत असल्यामुळे मी तुमच्या नैतिकतेला, सारासार विचार बुद्धीला जागृत करण्यासाठी इथे आलो आहे. घरात बसू नका, रात्र वैऱ्याची आहे असे आवाहन दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, राजकीय विश्लेषक, प्रखर वक्ते लोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी केले.
मूल येथील श्री साई मित्र परिवार बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दशा आणि दिशा शेतकऱ्यांची, राजकारणाची व देशाची या विषयावर आज बुधवार दि. १३ नाव्हेंबरला आयोजित मार्गदर्शन सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत चेपूरवार उपस्थित होते. पुढे बोलतांना ते (Prakash Pohare) म्हणाले की, गडचिरोली व चंद्रपूरच्या मातीत हा गुण आहे की, इथल्या माणसांना अन्यायाची चिड येते. येथील नक्षलवाद म्हणजे काय आणि तो कसा फोफावला याचे विश्लेषण केले. शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशिल विषयावर लढा दिल्याने या देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मला २००८ साली दिल्लीत बोलावून प्रश्न समजावून घेतला व देश्यातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले. असा संवेदनशिल पंतप्रधान मी दुसरा बघीतला नसल्याचे पोहरे यावेळी म्हणाले.
सज्जनांची संघटना बनविण्याची गरज – चंदू पाटील मारकवार
२०१४ नंतर सर्वसामान्य माणसांच्या चळवळी तोडण्याचे काम करण्यात आले असून आपण नागरिक म्हणून गुलामगिरीकडे वाटचाल करीत आहोत. मात्र यातून सुटका करायची असेल तर आम्हाला शक्ती निर्माण करावी लागेल. सज्जनांची संघटना बनवावी लागेल, शेतकऱ्यांची संघटना बनवावी लागेल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार यांनी केले. राज्यात जे काही सुरू आहे ते योग्य नाही त्यासाठी बदल घडवावा लागेल, असेही ते म्हणाले. शेतकरी जो पर्यंत सुखी होणार नाही, प्रत्येक युवकांच्या हाताला स्वाभीमानाचे काम मिळणार नाही तोपर्यंत हा लढा लढायचा आहे, असे यावेळी मारकवार म्हणाले.