गृह मतदानाच्या पहिल्याच दिवशी 2 हजार 116 नागरिकांचे मतदान:1794 ज्येष्ठ नागरिक, 322 दिव्यांगांचा समावेश
2 hours ago
1
ऐंशी वर्षांहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी प्रशासनाने गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध करुन दिला असून १४ ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी २ हजार ११६ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ हजार ७९४ ज्येष्ठ नागरिक आणि ३२२ दिव्यांग नागरिकांचा समावेश आहे. यंत्रणेने या सर्वांच्या घरी जाऊन मतपत्रिकेच्या माध्यमातून त्यांचे मतदान करवून घेतले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान करवून घेतले जात आहे. या मोहिमेला सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. तीन दिवसांत शंभर टक्के मतदान करवून घेण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे. गृह मतदान सुरु करण्यापूर्वी निवडणूक कामात व्यस्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करवून घेतले. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघातील १३१६, बडनेरा येथील १४३०, अमरावतीच्या २२८९, तिवस्याच्या १०२६, दर्यापुरच्या ११८०, अचलपुर येथील १०४७, मोर्शीच्या ११७९ आणि मेळघाटच्या ११८० अशाप्रकारे १० हजार ६३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या सील करण्यात आल्या असून त्या आता मतमोजणीच्या दिवशी उघडल्या जाणार आहेत. उर्वरित ७०२ मतदारांसाठी आणखी २ दिवस गृह मतदानाच्या प्रक्रियेत पहिल्या दिवशी २ हजार ११६ मतदारांनी सहभाग नोंदविल्यामुळे ७०२ मतदार अजूनही उरले आहेत. यामध्ये ६२३ ज्येष्ठ नागरिक आणि ७९ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यापैकी काही जणांनी आजच्या दुसऱ्या दिवशी आपला हक्क बजावला. उर्वरित मतदारांचे उद्या दिवसभरात मतदान करवून घेतले जाईल, असे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)