Published on
:
15 Nov 2024, 5:02 pm
Updated on
:
15 Nov 2024, 5:02 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND Vs SA 4th T20I : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर चौथ्या टी-20 सामन्यात विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सॅमसन आणि तिलक यांनी तुफानी फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. दुसऱ्या विकेटसाठी या दोन फलंदाजांमध्ये 86 चेंडूत 210 धावांची भागीदारी झाली. या विक्रमी भागिदारीच्या जोरावर भारताने 20 षटकात एक विकेट गमावून 283 धावा केल्या.
गेल्या दोन सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या सॅमसनने पुन्हा एकदा शतक झळकावले. तर तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. तिलकने 47 चेंडूंत नऊ चौकार व 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या तर सॅमसनने 56 चेंडूंत सहा चौकार व नऊ षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या.