Published on
:
15 Nov 2024, 5:00 pm
Updated on
:
15 Nov 2024, 5:00 pm
नागपूर : काँग्रेसला कुठल्याही विचारांशी घेणेदेणे नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचे पाप केले. आमच्या सरकारने कायम 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास आणि सबका विकास' हेच उद्दिष्ट बाळगले. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेमध्ये साडेनऊ कोटी महिलांना गॅस सिलींडर दिले. महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेत सामावून घेतले. जात किंवा धर्म बघून आमच्या सरकारने योजनांचा लाभ दिला नाही. याउलट काँग्रेसने मात्र देशात जातीवादाचे विष कालवण्याचे काम केले, या शब्दांत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
म्हाळगीनगर चौक येथे दक्षिण नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार मोहन मते आणि बांगलादेश येथे मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ गडकरी यांच्या जाहीरसभा झाल्या. विकास कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, गिरीश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसने फक्त गरिबी हटावचा नारा दिला. पण स्वतःचीच गरिबी दूर केली. शाळा-कॉलेज उघडले, स्वतःच्याच मुलांना तिकीट दिले. आम्ही डीएड, बीएड कॉलेज सुरू केले नाही आणि स्वतःच्या मुलांना तिकीटही दिले नाही. आमच्या पक्षाने कधीही परिवारवादाचे राजकारण केले नाही.दहा वर्षांमध्ये नागपूर मोठ्या प्रमाणात बदलले. पुढच्या काळात सहा मार्केट्स, फुड मॉल उभारले जाणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय तर होणारच आहे, शिवाय स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे.
हलबा समाजाचे जटील प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला. हलबा समाजाशी माझे फार जुने नाते आहे. त्यामुळे जिवंत आहे तोपर्यंत हलबा समाजाच्या पाठिशी उभा राहीन. माझ्या विरोधात गेलेल्यांचेही काम करेन, असा विश्वास गडकरी यांनी दिला.
बांगलादेशमध्ये (नागपूर)घरांच्या मालकीहक्काचा अडचणीचा विषय होता. आम्हाला सर्वांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे होते. त्यासाठी कायद्यांमध्ये दुरुस्ती केली. एक हजार रुपयांत रजिस्ट्री करण्याकरिता जीआर काढण्याची विनंती राज्य सरकारला केली. आता जवळपास हजार लोकांच्या घराच्या रजिस्ट्री झाल्या, असेही गडकरी यांनी सांगितले.
उमरेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचारार्थ उमरेड येथे गडकरी यांची जाहीर सभा झाली. ते म्हणाले, ‘उमरेड व परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले आहेत. परिसरात मागील १० वर्षांत उत्तम रस्ते झाले. पायाभूत सोयीसुविधा, सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांतील विकासकामांमुळे उमरेड हे आता नागपूरचे सॅटेलाईट शहर म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले.