Published on
:
03 Feb 2025, 4:18 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:18 am
मुंबई : Mumbai Bike Taxi | राज्याच्या परिवहन विभागाने दोन महिन्यांत मुंबईसह शहरी भागात बाईक (दुचाकी) टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाईक टॅक्सीला पारंपरिक काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीचालकांनी विरोध केला आहे.
मुंबईत ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. यानुसार राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाईक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार आहे. अॅपबेस्ड एग्रीगेटर्सच्या ताफ्यात किमान ५० दुचाकी असणे आवश्यक आहे, त्यासाठी एक लाख रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नियमावलीनुसार, दहा हजारांपेक्षा जास्त ताफा असलेल्या एग्रीगेटर्ससाठी पाच लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मुंबईत १० किमी आणि इतर शहरांमध्ये ५ किमीच्या परिसरात बाईक टॅक्सी चालवण्यास परवानगी आहे. सर्व बाईक जीपीएसयुक्त असून दुचाकी चालकांची नोंदणी आणि मूलभूत प्रशिक्षण देखील बंधनकारक आहे
रिक्षा-टॅक्सी संघटनांचा विरोध का ?
बाईक टॅक्सी सुरक्षित नाहीत. त्यांच्या चालवण्यावर बंधन नसते. चालकाच्या विश्वासार्हतेवरही संघटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बाईक टॅक्सीमुळे रिक्षा-टॅक्सी व्यवसायाला धोका असून ते सुरक्षित नाही. बाईक टॅक्सी धोकादायक असल्याने दिल्ली सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही यावर बंदी घालावी.
गोव्यात बाईक टॅक्सीला पसंती
भारतात गोवा राज्यात बाईक टॅक्सीला प्रथम परवानगी देण्यात आली. गोव्यात पर्यटकांची संख्या जास्त आहे. येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अरुंद रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे येथे बाईक टॅक्सीला पर्यटक पसंती देतात.
मुंबईत २९ लाख दुचाकी रजिस्टर आहेत. दुचाकीचालकांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यात आता बाईक टॅक्सीची भर पडल्यास वाहतूक कोंडीत अजून भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय दुचाकींच्या अपघातांची संख्या मोठी आहे.