>> बद्रीनाथ खंडागळे
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्यामुखी वेद वदवले व कर्मठ धर्ममार्तंडांना ‘जीव-शीव’ एकच असल्याचा दृष्टांत दिला. समता व बंधुता यांचा कृतीशील आदर्श जगासमोर मांडणाऱ्या या अलौकिक घटनेला आज 738 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पैठणकरांनी रेडामूर्तीवर पुष्पवृष्टी करून वेदमंत्रोच्चारात विधीवत पूजा केली.
जुन्या पैठणचा भाग असलेल्या ‘पालथी नगरी’ परिसरात वसंत पंचमी पर्वावर शालिवाहन शके 1209 (इ.स. 1287) रोजी 738 वर्षांपूर्वी ही ऐतिहासिक घटना घडली होती. ‘संन्याशांची मुले आहात. अशा अनौरस संततींना मुंजीचा अधिकार नाही !’ असा ठपका ठेवून पैठणच्या धर्म-सभेतील कर्मठ धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वरादी भावंडांना शुद्धीपत्र देण्यास नकार दिला होता. तेव्हा गोदावरी नदीकडे जात असलेल्या रेड्याला थांबवून माऊली ज्ञानेश्वरांनी त्याच्या मुखातून चक्क वेद वदवून घेतले.
कालांतराने त्याच ठिकाणी रेड्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. तेथे आज 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या पर्वावर ‘माऊलीं’चे 34 वे वंशज अरुण जावळे यांच्या हस्ते रेड्याच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून वेदमंत्रोच्चारात विधीवत पूजा अर्चा केली.
रवींद्र जोशी व गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. ज्येष्ठ शिवसैनिक बंडेराव जोशी व सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख यांनी मनोगत व्यक्त केले. तर पैठण कुंभमेळा पुरोहित संघाचे अध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न कमलाकर शिवपुरी व बापू गर्गे यांनी तत्कालीन शुद्धीपत्र आणि रेड्याने वदवलेल्या वेदाचे वाचन केले.
यावेळी गणेश गुरव, अनिल सराफ, ईश्वर म्हस्के, प्रभाकर गिरे, संतोष छडीदार, पवन जोशी, प्रसाद खिस्ती, सचिन जाधव, पंढरीनाथ फुलझळके, कांता वरकड, शहादेव लोहारे, शेखर गोबरे, भालचंद्र बेंद्रे, पीयूष सराफ, गोविंद शिंदे, लालू सराफ, संतोष कुलकर्णी व मिलिंद नाईक उपस्थित होते.