नेर (Yawatmal):- नगरपरिषद (municipal council) हद्दीतील पंचायत समितीच्या कॉटरमध्ये चालणाऱ्या अंगणवाडीत तब्बल २५ चिमुकले शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षणासाठी वापरली जाणारी खोली केवळ 10 x 12 फूट असून, आजूबाजूला अस्वच्छता आणि मुरमाचे ढिगारे साचलेले आहेत. या ठिकाणी असलेल्या पोषण आहार कक्षात नुकताच तब्बल पाच फूट लांबीचा साप आढळून आला.
पोषण आहार असलेल्या ठिकाणी निघाला पाच फुटाचा साप
याबाबत विचारणा केली असता नगरपरिषद, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी तसेच बालविकास एकात्मिक केंद्राचे अधिकारी यांनी हे आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील १ ते २५ क्रमांकाच्या अंगणवाड्या कोणाच्या जबाबदारीत आहेत, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील लहानग्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत मुलांचे आरोग्य आणि शिक्षण सुरक्षित कसे राहणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.