परभणी/गंगाखेड (Parbhani) :- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवठाणा ता. पूर्णा येथे शेत रस्त्यावरून दोन गटात झालेल्या वादात पाच जण जखमी झाले असुन याप्रकरणी रविवार २ फेब्रुवारी रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात (police station)दाखल झालेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गटातील एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवठाणा ता. पूर्णा येथील गिरीधर पंडीत जोगदंड व त्यांचा चुलत भाऊ रामप्रसाद सोपानराव जोगदंड यांच्यात शेत रस्त्याचा वाद आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या रस्त्यावरून रामप्रसाद सोपानराव जोगदंड हे ऊस तोडण्याची मशीन शेतात घेऊन जातांना त्यास येथून जायचे नाही असे सांगितल्याने दोघांत वाद झाला. तेंव्हा तिथे आलेल्या रामप्रसाद जोगदंड याचे वडील सोपानराव जोगदंड यांनी यापुढे आम्ही तुझा रस्ता अडविणार नाही “तु ही रस्ता अडवू नको” असे म्हणत वाद मिटविला.
शिवीगाळ केल्याने वाद वाढला..
शेतातून गावाकडे जातांना रस्त्यात भेटलेल्या गोविंद जोगदंड, रमेश जोगदंड व पुरुषोत्तम जोगदंड यांच्यापैकी पुरुषोत्तम जोगदंड याने रस्ता तुझ्या बापाचा आहे का, रस्ता का अडवितो, तु जर रस्ता आडवशील तर हा रस्ता माझ्या शेतातून जातो या रस्त्यावरून तु जायचे नाही असे म्हटले तर गोविंद याने दोन चापटा मारल्या व तिघांनी शिवीगाळ केली. गोविंद जोगदंड दत्त मंदिर कमानी जवळ बसलेला दिसल्याने व त्याने मारहाण केल्याचा राग असल्याने गिरीधर जोगदंड व त्यांचा पुतण्या श्रीधर जोगदंड यांनी गोविंद यास चापटांनी मारहाण(beating) केली. तेंव्हा गावातील काही जणांनी सोडवा सोडव केली. वाद मिटल्याने आपापले घरी निघुन गेल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास सचिन रमेश जोगदंड याने सायळा खटींग येथील गोपाळ शिंदे व त्याचे इतर तीन साथीदारांना गावात बोलावुन घेतले.
मारहाण केल्याने दोन्ही गटात झाला वाद
फिर्यादीचा पुतण्या श्रीधर जोगदंड हा मारोती मंदीराजवळ उभा असतांना सचिन जोगदंड त्याचे सोबत आलेल्या लोकांना म्हणाला की श्रीधरने वाळुचे टिपरच्या गुन्ह्याच्या पंचनाम्यावर सह्या केल्या आहेत असे म्हणून सचिन जोगदंड व त्याचे सोबत आलेल्या गोपाळ शिंदे व तीन अनोळखी साथीदारांनी श्रीधर यास हाता पायावर, डोक्यावर, व कमरेवर त्याचे हातातील वेळूच्या काठयांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी व त्याचा भाऊ अंकुश जोगदंड भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना देखील मारहाण केल्याने दोन्ही गटात वाद झाला व तुम्ही बाहेर भेटा तुम्हाला अजुन मारहाण करतो असे म्हणुन सचिन जोगदंड त्याच्या मित्रांसोबत तेथुन निघुन गेल्याची फिर्याद गिरीधर जोगदंड वय ४४ वर्ष यांनी दिल्यावरून गोविंद जोगदंड, रमेश जोगदंड, पुरुषोत्तम जोगदंड, सचिन रमेश जोगदंड, गोपाळ शिंदे व अन्य तीन अनोळखी इसम अशा एकुण आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
भांडणात दोन्ही गटातील एकूण पाच जण जखमी
याच प्रकरणी परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपाचार घेत असलेल्या सचिन रमेश जोगदंड वय ३१ वर्ष याने दिलेल्या फिर्यादित शेत रस्त्यावरून ऊस घेऊन जाण्याच्या करणावरून गिरीधर जोगदंड, अंकुश पंडीत जोगदंड, पंडीत भिमराव जोगदंड, किशोर गिरीधर जोगदंड, कृष्णा उर्फ बाळू जोगदंड, बळीराम उर्फ बंडू जोगदंड व श्रीधर जोगदंड यांनी रस्ता अडवून येथून ऊस घेऊन जाऊ देत नाही असे म्हणत चुलत्यासोबत भांडण केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी सचिन जोगदंड व त्याचे नातेवाईक अक्षय जोगदंड, गोपाळ शिंदे दोघे रा. सायळा खटिंग हे गेले असता वरील सात जणांनी देवठाणा येथील भवानी मंदिराच्या ओट्याजवळ सचिन जोगदंड व अक्षय खटिंग यांना लोखंडी रॉड, ट्रॅक्टरची पिन व छोटी तलवार हातात घेऊन मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद दिल्याने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेत रस्त्यावरून झालेल्या भांडणात दोन्ही गटातील एकूण पाच जण जखमी झाले असुन परस्परविरोधी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास अनुक्रमे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे व बिट जमादार दिपक व्हावळे हे करीत आहेत.