साळेगाव येथील मुस्तकिन जब्बार शेख याचा प्रेमप्रकरणातून खून करण्यात आला. Pudhari Photo
Published on
:
03 Feb 2025, 2:36 pm
Updated on
:
03 Feb 2025, 2:36 pm
केज : बीड जिल्ह्यातील एका विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून पाहुण्याच्या घरी जेवणाच्या बहाण्याने बोलावून त्याचा खून करून मृतदेह महामार्गावर फेकून दिला. ही खळबळजनक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली असून खून झालेला तरुण हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील आहे. (Beed Crime News)
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण मुस्तकिन जब्बार शेख हा धाराशिव जिल्ह्यातील (मोहा, ता. कळंब) येथे एका मस्जिदमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत आहे. मुस्तकिन शेख याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे. परंतु, त्याची पत्नी व त्याचे पटत नसल्याने ते दोघे विभक्त राहत होते. दरम्यान, मुस्तकिन शेख याचे पुणे येथे मूळची बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील असलेल्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली. त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, त्यांचे हे संबंध त्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना मान्य नव्हते. या बाबत दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले; मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. (Beed Crime News)
दरम्यान, मुस्तकिन शेख याने त्याच्या आई-वडिलांना ते दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे त्या महिलेचे वडील सरदार शेख व भाऊ अकबर शेख यांनी मुस्तकिन शेख याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते.
दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८:३० वा. चे सुमारास मुस्तकीन शेख याने त्याच्या आईला सांगितले की, तो मौजे गोजवाडा येथे सरदार शेख व अकबर शेख यांनी त्याचे बहिणीच्या घरी मेजवाणी आयोजित केली आहे. मी दोन तासांमध्ये परत येतो, असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर त्या महिलेचा वडील सरदार शेख, भाऊ अकबर शेख, दुसरा भाऊ व त्याचा मेव्हणा या चौघांनी दि. २ फेब्रुवारीरोजी रात्री १२ वाजता मुस्तकिन शेख याचा खून करून त्याचे प्रेत हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर फेकून अपघात घडल्याचा बनाव केला.
मृत मुस्तकिन याच्या खून प्रकरणी त्याचे वडील जब्बार शेख यांच्या तक्रारी वरून दि. ३ फेब्रुवारी रोजी वाशी, जि. धाराशिव पोलीस ठाण्यात सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख व दुसरा मुलगा आणि त्यांचा मेव्हणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे तपास करीत आहेत.
मुस्तकिन शेख यांचा खून कसा झाला :-
दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास मुस्तकीन यांने त्याचे वडील जब्बार शेख यांना फोन वरून सांगुतले की, त्याचे प्रेम असलेल्या महिलेचा भाऊ अकबर शेख व त्याचा मित्र असे त्याला भेटण्यासाठी मोहा (ता. कळंब) येथे येणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४ वाजता मुस्तकीन हा त्याच्यासोबत अकबर शेख व अकबरचा मित्र हे दोघे साळेगाव येथे आले आणि उद्या त्या महिलेचे वडील व भाऊ हे त्यांना सोयरिकीसाठी भेटायला येतो, असे म्हणून निघून गेले.
दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सरदार शेख, त्या महिलेचा भाऊ व तिच्या बहिणीचा नवरा असे साळेगाव येथे आले. त्यावेळी त्यांनी मुस्तकिन याच्या आईला सांगितले की, तुमच्या पोराला समजून सांगा, अन्यथा काय होईल ते सांगता येत नाही, असे म्हणून धमकी देऊन गेले.
दि. २ फेब्रुवारीरोजी सायंकाळी ८. ३० वाजता सुमारास मुस्तकीन याने त्याच्या आईला सांगितले की, तो मौजे गोजवाडा येथे सरदार शेख व अकबर शेख यांनी त्यांच्या बहिणीच्या घरी मेजवाणी आयोजित केली आहे. मी दोन तासांमध्ये परत येतो, असे सांगून फोन ठेवला.
दि. २ फेब्रुवारीरोजी रात्री १२ वाजता मुस्तकिन याचे प्रेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर आढळून आल्याची माहिती त्याच्या आई वडिलांना मिळाली.