Published on
:
03 Feb 2025, 2:22 pm
Updated on
:
03 Feb 2025, 2:22 pm
कन्नड : तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुभाष कचरु गोडसे यांच्या आडगाव (जेहुर) शिवारातील ऊसतोडणी सुरू असताना आठ दिवसाची तीन बिबट्याची बछडे ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना ३ फेब्रुवारी सोमवारी सकाळी आढळून आले. एकाच ठिकाणी बिबट्याची तीन बछडे आढळून आल्याने मादी देखील याच परिसरात असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी बछडे आढळल्यानंतर ऊस कामगारांनी तोडणीचे काम थांबवले. सरपंच संभाजी गोडसे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय नागरगोजे, वनरक्षक अविनाश नागरगोजे, वनरक्षक दिव्या नागरगोजे, वनमजूर शेख शहीद, शेख मकसुद, वनमजुर अशोक आव्हाड, रामेश्वर राठोड यांनी ऊसाच्या शेतात जाऊन पाहणी केली.
पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
तांदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्यासह या चार पिलांना बंदिस्त करून इतरत्र ठिकाणी अधिवासात सोडावा अशी मागणी सरपंच संभाजी गोडसे, सुभाष गोडसे, मंगेश गोडसे, प्रमोद गोडसे, अमोल गोडसे, बाळासाहेब गोडसे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
रात्री ऊसाच्या शेताचा संपूर्ण परिसर आम्ही निमर्नुष्य करणार आहोत. रात्रभर त्या बछड्याच्या आईची वाट बघणार आहोत. शक्यतो रात्री बछड्याची आई येऊन आपले बछडे इतरत्र ठिकाणी घेऊन जाईल. पण कधी कधी चार -चार दिवस देखील मादी पिल्लांना नेत नाही. जोपर्यंत मादी पिल्लांना इतरत्र घेऊन जात नाही तोपर्यंत त्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये.
आनंद गायके वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड