“राज्यात नवीन सरकार येऊन 2 महिने झालेत, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही”, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पलटवार करत राऊतांना उत्तर दिले होते. “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले, असं एकनाथ शिदेंनी म्हटलं होते. काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे, काळी जादू काय त्यांना अधिक माहिती, कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादूचं आलं असावं”, असे रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांना जबरदस्त टोला लगावला. “सकाळी नऊ वाजताची मुलाखत देणं बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
राजकीय आरोपांची आवश्यकता नाही
“याच वर्षा बंगल्याने मागच्या अडीच वर्षात लाखो महाराष्ट्रातील लोक बघितले. जो वर्षा बंगला स्वतःसाठी वापरला जायचा, तो जनतेला बघता आला नाही. तो एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने बघितला. त्या ठिकाणी जर थोडा मेंटेनन्स सुरु असेल, तर राजकीय आरोपांची आवश्यकता नाही”, असे उदय सामंत म्हणाले.
“सकाळी नऊ वाजताची मुलाखत घेणे, बंद करा तर ती काळू जादू पण बंद होईल. मी पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी पत्रकार परिषद सुरू करणार आहे. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने मनावर घेतलं नाही”, असेही उदय सामंत म्हणाले.
त्याचे विरोधकांनी भांडवल करू नये
“एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नाही. तर त्याचे विरोधकांनी भांडवल करू नये. चर्चा सूत्रांच्या माध्यमातून होत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले, ते संवेदनशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. शिवसेनेच्या इतिहासात यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं. नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत. ते नाराज होऊ शकत नाहीत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचे राजकीय भांडवल होऊ नये, ते विरोधकांनी करू नये”, असेही उदय सामंतांनी सांगितले.