Published on
:
03 Feb 2025, 12:32 pm
Updated on
:
03 Feb 2025, 12:32 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : मलेशियात खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या कामगिरीबद्दल, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय U19 महिला संघाला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. विजेत्या संघातील सर्व सदस्य, मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचा-यांमध्ये ही पुरस्काराची रक्कम वाटली जाईल.
एका अधिकृत निवेदनात, बीसीसीआयने भारतीय अंडर-19 महिला संघाचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. सर्व प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवल्याबद्दल आणि त्यांच्या वयोगटात 'वर्ल्ड चॅम्पियन' म्हणून पुन्हा एकदा आपली श्रेष्ठता सिद्ध केल्याबद्दल बोर्डाने संघाचे कौतुक केले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, ‘19 वर्षांखालील महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन. ही एक अविस्मरणीय मोहीम ठरली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. ही कामगिरी अभिमानास्पद आहे.’
भारताने विजेतेपद कसे जिंकले?
क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, द. आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकांत 82 धावांवर बाद झाला. प्रोटीज संघाचे 7 फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडाही गाठता आला नाही. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, सलामीवीर त्रिशाने नाबाद 44 धावांची खेळी करून टीम इंडियाला 11.2 षटकांत विजय मिळवून दिला. भारतीय संघ स्पर्धेत सलग 7 सामने जिंकून अजिंक्य राहिला.
त्रिशा ठरली ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'
या स्पर्धेत गोंगाडी त्रिशाने शानदार कामगिरी केली. तिने 7 डावांमध्ये 77.25 च्या सरासरीने आणि 147.14 च्या स्ट्राईक रेटने एकूण 309 धावा केल्या. यादरम्यान तिने एक शतकही झळकावले. स्पर्धेत 300 पेक्षा जास्त धावा करणारी ती एकमेव फलंदाज आहे. दुसरीकडे, गोलंदाजीतही तिने चमकदार कामगिरी केली. तिने 4 डावात 6.42 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ती ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरली.