Published on
:
03 Feb 2025, 12:37 pm
Updated on
:
03 Feb 2025, 12:37 pm
औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील मौजे असोला तर्फे औंढा (ना) येथील ग्रामरोजगार सेवक दिगंबर बांगर यांच्याकडून अनेक कामांच्या बाबतीत निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दिसून येत होता. शिवाय त्यांच्या कामात स्पष्टता दिसून येत नव्हती. या संदर्भात ग्रामस्थांकडून औंढा पंचायत समितीचे ग्राम रोजगार हमीचे विस्तार अधिकारी यांना 22 फेब्रुवारी 2024 आणि 27 नोव्हेंबर 2024 रोजी लेखी तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून आम्ले आणि बर्वे यांची नियुक्ती केली होती.
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी औंढा नागनाथ पंचायत समितीला ग्राम रोजगार सेवकाच्या कार्यपद्धतीचा अहवाल दाखल केला. या अहवाला मध्ये त्यांनी ग्रामरोजगार सेवकाला दोषी ठरवत त्या विरुद्ध ग्रामसभेत तात्काळ निर्णय घेण्याच्या आदेश काढले आहेत. या अहवालात चौकशी अधिकारी यांनी कामकाजात शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली नसल्याने म्हटले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत एक ते सात नमुने अभिलेख ग्रामपंचायत मध्ये अद्ययावत करून ठेवलेले नाही. चौकशीदरम्यान मूळ अभिलेखे दर्शविले नसल्याने व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची नीट काळजी न घेतल्याचा ठपका ठेवून चौकशी अधिकारी तथा पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी सदर ग्राम रोजगार सेवका संदर्भात ग्रामसभेमार्फत त्वरित निर्णय घेण्याचे आदेश असोला ग्रामपंचायतीला दिले आहेत.