परभणी (Parbhani) :- शेतातील ऊस काढत असताना अचानक हार्वेस्टर मशीनने (Harvester Machine) पेट घेतला. ही घटना रविवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील नांदगाव बु. शिवारात घडली. सदर आगीत २० गुंठे क्षेत्रावरील ऊस आणि हार्वेस्टर मशीन जळून खाक झाले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
परभणी तालुक्यातील नांदगाव बु. शिवारात हनुमान जवंजाळ यांच्या गट नंबर ३१ मध्ये ऊस काढणीचे काम चालू होते. यावेळी आणण्यात आलेल्या हार्वेस्टर मशीनने अचानक पेट घेतला. आगीत ऊस आणि हार्वेस्टर जळाले. घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला (fire brigade) देण्यात आली. अग्निशमन अधिकारी डि.यु. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव देशमुख, उमेश कदम, रोहिम गायकवाड, वाहन चालक संतोष पोंडाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविली.