Published on
:
03 Feb 2025, 12:39 pm
Updated on
:
03 Feb 2025, 12:39 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटानं नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता सिनेमाचे प्रमोशनल साँग व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्तानं लॉन्च करण्यात आलं.
'स ला ते स ला ना ते' या चित्रपटात वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट आहे. त्याशिवाय राजकारण, गुन्हेगारी, प्रशासन असे अनेक पदर या कथानकाला आहेत. विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये घडणारी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे.
प्रेम म्हणजे....? या प्रमोशनल सॉंगमध्ये प्रेमाची संकल्पना रॅप शैलीत मांडण्यात आली आहे. या रॅप गाण्याचे शब्द सुजय जिब्रिश यांनी लिहून गायले आहेत. त्यांना आस्था लोहार यांनी साथ दिली आहे. अनिरुद्ध निमकर यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स हे म्युझिक प्रोड्युसर आहेत.
'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.