कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाड्या सुसाट; 50 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवासPudhari Photo
Published on
:
03 Feb 2025, 9:55 am
Updated on
:
03 Feb 2025, 9:55 am
पुणे: रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी पुणे विभागातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि जवळपासच्या रेल्वे स्थानकांसाठी प्रवास केला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 144 वर्षांतून येणार्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जानेवारी महिन्यात तर दोन शाही स्नानांची तिथी होती. त्यामुळे पुण्यातून बहुसंख्य नागरिक उत्तर प्रदेशातील प्रयागराजकडे निघाले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.
रेल्वेच्या गाड्या अजूनही फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना ऑनलाईन तिकिटे सध्या उपलब्धच होत नाहीत. यामुळे प्रवासी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. असे असले तरी रेल्वेच्या पुणे विभागाकडून भाविकांसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्यांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच गाड्यांद्वारे रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी 2025 महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
वीस दिवसांतील पुणे विभागाचे नियोजन
रेल्वेच्या पुणे विभागाकडून नियमित दानापूर रेल्वे गाडी दररोज प्रयागराजसाठी धावत आहे. या व्यतिरिक्त चार साप्ताहिक विशेष गाड्या प्रयागराज साठी धावत आहेत. या गाड्यांव्यतिरिक्त सहा कुंभमेळा स्पेशल रेल्वे गाड्या रेल्वेच्या पुणे विभागाने सोडल्या आहेत.
तसेच, हुबळीहून तुंडलासाठी (उत्तरप्रदेश) विशेष गाडी धावत आहे. अशा सुमारे 12 ते 13 रेल्वे गाड्या प्रयागराज साठी धावत आहेत. दि. 1 जानेवारी 2024 ते 20 जानेवारी 2025 या वीस दिवसांच्या कालावधीत पुणे विभागातून 49 हजार 363 प्रवाशांचा उत्तर प्रदेशसाठी प्रवास झाला आहे.
प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे गाड्यांना मोठी मागणी आहे. याकरिता आम्ही नियमित गाड्यांव्यतिरिक्त अतिरिक्त विशेष गाड्या सोडल्या आहेत. विशेष गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. पुण्यासह हुबळीहून सुद्धा विशेष गाड्या उत्तरप्रदेशसाठी धावत आहेत. अशा दिवसभरात 12 ते 13 गाड्या पुणे विभागातून उत्तरप्रदेशच्या दिशेने धावत आहेत.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग