शेकडो वर्षांपासून वाहत असलेली गंगा नदी ही भारतीयांसाठी जेवढी जीवनदायिनी नदी आहे, तेवढंच या नदीचे धार्मिक महत्त्वही आहे. अनेक धार्मिक ग्रंथात गंगा नदीचा उल्लेख आढळतो. गंगाजल हे हिंदूसाठी अतिशय पवित्र असं जल आहे. मात्र हे गंगाजल कधीच खराब होत नाही. गंगेचं हे जल कसं निर्मळ राहतं? याचं रहस्य संशोधकांनी अनेक वर्षाच्या अथक परिश्रम आणि रिसर्चमधून शोधले आहे. नागपूरच्या संशोधकांनी त्याचा शोध घेतला आहे.
हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूसाठी श्रद्धेचे स्थान आहे. गंगाजल अनेक महिने साठवून ठेवले तरी ते खराब होत नाही. एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी धार्मिक सणांच्यावेळी लाखो भाविक स्नान करतात तरी त्यातून कुठलीच महामारी किंवा रोगराई पसरत नाही. गंगाजल निर्मळ का राहते? याचं रहस्य देशातील नामांकित ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था’ म्हणजेच ‘निरी’ च्या वैज्ञानिकांनी उलगडले आहे.
तीन टप्प्यात संशोधन
गंगाजलामध्ये स्वत:ला स्वच्छ करून घेण्याचा गुणधर्म आहे. गंगेच्या पाण्यात असलेल्या ‘बॅक्टीरियोफेज’ ची प्रचुर मात्रा असते. जे गंगेचं पाणी दूषित होण्यापासून बचाव करते. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’ अंतर्गत निरीचे संशोधक डॉक्टर कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनासाठी गंगेला तीन टप्प्यात विभागण्यात आलं.
1- गोमुख ते हरिद्वार
2 – हरिद्वार ते पाटणा
3 – पाटणा ते गंगासागर
म्हणून पाणी निर्मळ
याबाबत निरीचे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैज्ञानिकांनी यासाठी 50 विविध ठिकाणचे गंगाजल आणि नदीखालची वाळू आणि मातीचे नमुने घेतले. गंगा नदीत सेल्फ प्युरिफाइडचे तत्त्व असतात, असं आम्हाला आढळून आलं. गेल्या वेळच्या कुंभच्या कालावधीतीलही नमुने वैज्ञानिकांनी गोळा केले होते. पाण्यातील किटाणू नष्ट करणारे बॅक्टेरियाफेज हे गंगाजलमध्ये आम्हाला आढळले. यासोबतच गंगाजलामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा देखील असल्याचे संशोधनात समोर आले, असं कृष्णा खैरनार यांनी सांगितलं. गंगेच्या पाण्यात या ऑक्सिजनची लेव्हल 20 मिलिग्राम प्रति लिटरपर्यंत आढळली. त्यासोबतच टरपीन नावाचे फायटोकेमिकलही सापडले. या तीन तत्त्वांमुळे गंगेचे पाणी निर्मळ राहते. ते कधीच खराब होत नाही, असं खैरनार म्हणाले.
यमुना, नर्मदेत मात्रा कमी
ही तत्त्व केवळ गंगा नदीतच आहेत की, इतर नद्यांमध्ये याचाही शोध वैज्ञानिकांनी घेतला. यासाठी यमुना आणि नर्मदा नदीतील पाण्यावर रिसर्च करण्यात आले. मात्र गंगेच्या पाण्यात असलेलं तत्त्व या नद्यांच्या पाण्यात अतिशय कमी मात्रेत असल्याचं समोर आलं. सध्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू असून लाखो भाविक गंगेत स्नान करतात. मात्र स्नान करण्याच्या पाच किलोमीटर समोरपासून गंगेचे पाणी हे निर्मळ होत. स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा गुणधर्म गंगा नदीत आहे. त्यामुळेच हे पाणी स्वच्छ राहतं.