नंदुरबार - अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेतीमाफीयांकडून ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या व मारहाणीच्या दोन घटना घडल्या आणि त्याविषयीचे गुन्हे दाखल झाले. त्याला पाच दिवस उलटल्यानंतर सुद्धा कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून दोषींना अटक करण्यात आलेली नाही. यावरून संतप्त झालेल्या जिल्हाभरातील तलाठ्यांनी अखेरीस काम बंदचे अस्त्र उपसले.
दोषींना अटक केली नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा 28 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिला होता. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना त्या विषयाचे निवेदन देण्यात आले होते. परंतु आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत कोणासही अटक झालेली नाही. यावरून शहादा व नंदुरबार तालुक्यातील संतप्त सर्व तलाठी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करीत काम थांबवण्याची भूमिका घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय केला असून उद्या दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत काम बंद राहील असे तलाठी संघाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या नंदुरबार तालुका शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राम महसूल अधिकारी हरीष पाटील सजा शिंदगव्हाण ता. नंदुरबार यांच्यावर दि. 28 जानेवारी रोजी रात्री जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळूमाफियावर दि. 29 जानेवारी रोजी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणात दोषी व्यक्तींना तीन दिवसात अटक न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा विनंती वजा इशारा संघटनेकडून देण्यात आला होता. परंतु आज पाच दिवस उलटूनही संबंधितास अजूनही अटक झालेली नाही. म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना तालुका शाखा नंदुरबार चे सर्व सभासद आरोपीस अटक होईपर्यंत डीएस्सी आपल्याकडे जमा करून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहोत, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.