आणे येथे तेलाचे डबे भरलेला ट्रक उलटलाPudhari
Published on
:
03 Feb 2025, 6:35 am
Updated on
:
03 Feb 2025, 6:35 am
बेल्हे: आणे (ता. जुन्नर) येथे कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर खाद्य तेलाचे डबे भरलेला ट्रक उलटला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला केबिनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या अपघातामध्ये कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही.
पारनेर तालुक्यातील सुपे येथून शेंगदाणा तेलाचे डबे व बॉक्स घेऊन भिवंडी येथे जाणारा ट्रक (एमएच १६ सीडी ७१११) रविवारी (दि.२) सायंकाळी सातच्या सुमारास आणे येथील उंबरी पुलाजवळ पलटी झाला.
पुढे चाललेल्या चारचाकी गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने त्याला वाचवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उतरून उलटला, असे ट्रकचे चालक संतोष दुश्मन यांनी सांगितले. गाडीत ४९५ तेल डबे व ४०० तेलाच्या बाटल्यांचे बॉक्स होते. रस्त्याने प्रवास करणारे आणे येथील नागरिक अजित वाव्हळ व पाराजी वाव्हळ यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील स्वप्नील थोरात व उपसरपंच सुहास आहेर यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी येवून स्थानिक नागरिकांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले.
घटनास्थळी रस्त्याने प्रवास करणारे व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांचा प्रामाणिकपणा यावेळी दिसून आला.मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमधून बाहेर पडलेल्या शेंगदाणा तेलाच्या बाटल्या व डबे आजूबाजूला पडलेल्या असताना कोणत्याही व्यक्तीने त्या मालाला हात सुद्धा लावला नाही.त्यामुळे ट्रकमधील मालाचे नुकसान टळले. आणे परिसरातील नागरिकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.