Published on
:
24 Sep 2024, 6:11 am
Updated on
:
24 Sep 2024, 6:11 am
नंदुरबार - नंदुरबार जिल्हा जणू दुचाकी चोरांचे केंद्र बनले असून रोज कुठल्या न कुठल्या मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होत असतो. आता चक्क या दुचाकी चोरांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात 'हाथ की सफाई' करून जिल्हा पोलीस दलाला आव्हान दिले आहे. गुन्हा केल्याबद्दल जिथे सजा फर्मावली जाते त्याच न्यायालय आवारात चोरी करायला गुन्हेगार धजावले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नंदुरबार जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंगच्या जागेत सचिन पुरूषोत्तम पारेख राहणार नंदुरबार यांनी लावलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांना सायंकाळी आढळून आले. मोटरसायकल कोणी नेली याचा तपास लागत नाही म्हणून अखेरीस काल त्यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. शहर पोलीस ठाण्यात याविषयी नोंद करण्यात आली आहे. ज्यांची मोटरसायकल चोरी झाली ते सचिन पारेख हे नंदुरबार जिल्हा न्यायालयात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. चोरीच्या गाड्या लपवण्यासाठी अथवा लोकांमध्ये खपवण्यासाठी दुचाकी चोरांच्या टोळ्या नंदुरबार लगतच्या मध्य प्रदेश व गुजरात सीमेचा फायदा घेतात तसेच मोलगी आणि धडगाव सारख्या दुर्गम भागाचा आडोसा घेतात, हे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या छापेमारीतून उघड झालेले आहे. तथापि अद्याप मोटरसायकल चोरीला आळा बसलेला नाही. जिल्हा न्यायालयाच्या आवारातील चोरीने हे अधोरेखित केले.