Published on
:
01 Feb 2025, 4:38 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:38 am
नाशिक : दाट धुक्यामुळे मागील महिनाभरापासून स्थगित करण्यात आलेली नाशिक- जयपूर विमानसेवा आजपासून (दि.1) पूर्ववत होणार आहे. या सेवेमुळे पिंक सिटी जयपूर आणि धार्मिक सिटी नाशिक हे दोन्ही पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहरे जोडली जाणार आहेत. हॉपिंग स्वरूपाची असलेली ही सेवा इंदूरमार्गे जयपूर अशी दिली जाणार आहे.
इंडिगो कंपनीने 29 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिक-जयपूर इंदूरमार्गे थेट विमानसेवा सुरू केली होती. परंतु दृश्यमानतेच्या समस्या आणि तांत्रिक कारणांमुळे 14 डिसेंबर 2024 पासून ही सेवा तात्पुरती बंद केली होती. आता पुन्हा एकदा ही सेवा सुरू केली जाणार असल्याने, नाशिककरांना पिंक सिटी जयपूर गाठणे शक्य होणार आहे.
दरम्यान, नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, इंदूर, बंगळुरू, गोवा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी सेवा दिली जात आहे. आता त्यात जयपूर या शहराचेही नाव जोडले जाणार आहे. दरम्यान, या सेवेसाठी 78 आसनी विमान इंडिगो कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. नाशिकहून दुपारी 2.40 मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. इंदूरमार्गे सायंकाळी 5.30 वाजता विमान जयपूर विमानतळावर पोहोचेल. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस ही सेवा असणार आहे.
नाशिकहून आतापर्यंत ज्या-ज्या शहरांना विमानसेवा जोडली गेली, त्या शहरांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षभरात नाशिकहून तब्बल सव्वातीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर, ठाणे या जिल्ह्यातील प्रवाशांचादेखील समावेश आहे. नाशिकच्या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जयपूरहून सकाळी 11.20 मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल व दुपारी 2.20 मिनिटांनी नाशिक विमानतळावर उतरेल. दुपारी 2.40 मिनिटांनी जयपूरसाठी उड्डाण होईल व सायंकाळी 5.30 ला विमान पोहोचेल.