नाशिक मध्य मतदारसंघातही लाडक्या बहिणींनी मतदानासाठी लावल्या रांगाPudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 10:33 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:33 am
नाशिक : गत लोकसभा निवडणुकीत उमेदवार समर्थक म्हणून भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यात जुन्या नाशकातील ज्या घासबाजार मतदान केंद्रासमोर जोरदार बाचाबाची झाली होती, विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी दोघांचा सामना झालाच.
दोन्ही उमेदवार समोरासमोर आल्यानंतर गिते समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू झाली, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने लोकसभा निवडणुकीतील वादाची पुनरावृत्ती टळली. नाशिक मध्य मतदारसंघात एकूण 56.34 टक्के मतदान झाले असून, उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत नाशिक मध्य मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात मतदान टक्का काहीसा कमी होता. विशेषत: लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रात मतदार घराबाहेर पडले होते, तुलनेत तितका उत्साह विधानसभा निवडणुकीच्या मतदानात दिसून आला नाही. सकाळच्या पहिल्या दोन तासांत या मतदारसंघात ७.५ टक्के मतदान झाले होते. सकाळी ९ वाजेनंतर मतदान केंद्रांमध्ये बऱ्यापैकी गर्दी जमली. जुन्या नाशकातील काही मतदान केंद्रांवर तसेच गंगापूररोड, कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू वस्तीतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक मध्य मतदारसंघात १८.४२ टक्के मतदान झाले होते.
मतदारांमध्ये महिला, ज्येष्ठ व नवमतदारांची संख्याही मोठी होती. सकाळी ११ वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढत गेला. दुपारी १ वाजेपर्यंत ३०.२७ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी २० मे रोजी जुन्या नाशकातील घासबाजार येथील मतदान केंद्रासमोर आ. फरांदे व माजी आमदार गिते यांच्यात बाचाबाची झाली होती. विधानसभा निवडणुकीत आ. फरांदे या भाजपच्या तिकीटावर तर गिते हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवार समोरासमोर आल्यानंतर काय घडणार, याचीच चर्चा मतदारसंघात होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास घासबाजार येथील मतदान केंद्रातून आ. फरांदे बाहेर पडत असताना आ. गिते यांच्याशी त्यांचा सामना झालाच. दोन्ही उमेदवार समोरासमोर आले. यावेळी गितेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण यांनी तत्काळ हस्तक्षेप करत अवघ्या काही मिनिटांतच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आ.फरांदे यांना भद्रकालीच्या दिशेने पुढे नेले तर, गिते हे पुढे घासबाजार मतदान केंद्रात गेले. त्यामुळे अनर्थ टळला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.५८ टक्के तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघातून ५१.४९ टक्के मतदान झाले.
शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अनेक भागात सकाळपासून रांगा लागल्या होत्या. शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. जुन्या नाशकातील सुमन नाईक शाळेतील मतदान केंद्रांवर २६ मतदारांकडून बोगस मतदानाची तक्रार करण्यात आली. चार मतदारांनी चॅलेंज वोट दिले. परंतु, उर्वरित २२ जणांना मतदान न करताच परतावे लागले. यातील काही जणांचे मतदान यादीतून डिलीट झाल्याचे सांगण्यात आले. काही केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. परंतु, लागलीच यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
अफवांचे पीक तरीही 'भयमुक्त' मतदान
बोगस मतदानासह पैसे वाटप अन् अफवांचे पीक यामुळे नाशिक मध्य मतदारसंघातील जुने नाशिक, वडाळागावासह काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, पोलिस फौजफाट्यामुळे संघर्ष टळला. 'भयमुक्त' वातावरणात मतदान पार पडले. रेणुकानगरला फरांदे समर्थकांकडून पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारींमुळे गिते समर्थकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. परंतु पोलिसांनी जमाव पांगवला. बी.डी.भालेकर शाळा, नॅशनल उर्दु शाळा, सुमन नाईक शाळेत मतदान प्रक्रिया संथ गतीने राबविली गेल्याची तक्रार केली जात होती. बी. डी. भालेकर शाळेसह जुन्या नाशकातील काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदारांची गर्दी होती.